महाराष्ट्रातील रहिवाशी, सिंघम म्हणून चर्चेत आलेले IPS शिवदीप लांडे यांचा राजीनामा, सांगितली पुढची योजना

| Updated on: Sep 26, 2024 | 10:00 AM

IPS Shivdeep Lande Resign: एवढ्या वर्षात मी बिहारला माझ्या आणि माझ्या कुटुंबापेक्षा वरचढ मानले आहे. सरकारी कर्मचारी असताना माझ्या काही चुका झाल्या असतील तर मी त्यांची माफी मागतो. आज मी भारतीय पोलीस सेवेचा (आयपीएस) राजीनामा दिला आहे, पण मी बिहारमध्येच राहीन आणि भविष्यातही बिहार माझे कार्यस्थान राहील.

महाराष्ट्रातील रहिवाशी, सिंघम म्हणून चर्चेत आलेले IPS शिवदीप लांडे यांचा राजीनामा, सांगितली पुढची योजना
IPS Shivdeep Lande Resign
Follow us on

IPS Shivdeep Lande Resign: महाराष्ट्रातील रहिवाशी असलेले बिहार केडरमधील आयपीएस शिवदीप लांडे यांनी पोलीस सेवेचा राजीनामा दिला आहे. 18 वर्ष पोलीस दलात सेवा केलेल्या शिवदीप लांडे बिहारमधील सिंघम म्हणून ओळखले जातात. सोशल मीडियावर शिवदीप लांडे यांनी स्वत: राजीनामा दिल्याची माहिती दिली आहे. काही दिवसांपूर्वी बिहारमधील आयपीएस काम्या मिश्रा यांनीही राजीनामा दिला होता. त्यामुळे बिहारमधील आयपीएसमध्ये राजीनामा सत्र सुरु झाले की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

तिरहुतसारख्या मोठ्या भागातून पूर्णियाला पाठवल्याबद्दल शिवदीप लांडे नाराज असल्याचे म्हटले जात होते. नियुक्तीच्या अवघ्या दोन आठवड्यांनंतर त्यांनी राजीनामा दिला आहे. काही दिवसांपूर्वी लेडी सिंघम म्हणून प्रसिद्ध असलेल्या आयपीएस अधिकारी काम्या मिश्रा यांनीही वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा दिला होता.

सोशल मीडियावर दिली माहिती

गुरुवारी आयपीएस शिवदीप लांडे यांनी सोशल मीडियावर राजीनामा दिल्याची माहिती दिली. यावेळी त्यांनी गणवेशात तिरंग्याला सलाम करतानाचे छायाचित्र शेअर केले आहे. IPS शिवदीप लांडे यांनी लिहिले आहे की, माझ्या प्रिय बिहार, गेली 18 वर्षे सरकारी पदावर काम केल्यानंतर आज मी पदाचा राजीनामा दिला आहे. एवढ्या वर्षात मी बिहारला माझ्या आणि माझ्या कुटुंबापेक्षा वरचढ मानले आहे. सरकारी कर्मचारी असताना माझ्या काही चुका झाल्या असतील तर मी त्यांची माफी मागतो. आज मी भारतीय पोलीस सेवेचा (आयपीएस) राजीनामा दिला आहे, पण मी बिहारमध्येच राहीन आणि भविष्यातही बिहार माझे कार्यस्थान राहील.

बिहारमध्ये लाखो फॅन

महाराष्ट्रातील असलेले शिवदीप लांडे सिंघम आयपीएस म्हणून लोकप्रिय झाले आहे. आपल्या कामगिरीने त्यांनी बिहारमधील लाखो युवकांच्या मनात घर केले आहे. बिहारच्या प्रत्येक जिल्ह्यात लांडे यांचे प्रचंड चाहते आहेत. ते मुझफ्फरपूरमध्ये जितके लोकप्रिय आहेत तितकेच पटनामध्येही आहे. युथ आयकॉन म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी राजीनामा दिल्यानंतर विविध राजकीय पक्षांनी त्यांच्याशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. आपल्या पक्षात येण्याच्या ऑफर त्यांना मिळू लागल्या आहेत.

IPS Shivdeep Lande facebook post

शिवदीप लांडे अकोल्यातील

शिवदीप वामनराव लांडे २००६ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. शिवदीप लांडे यांचा जन्म २९ ऑगस्ट १९७६ रोजी विदर्भातील अकोला जिल्ह्यात झाला. त्यांचे आई वडील हे सर्वसामान्य शेतकरी वर्गातील आहेत. त्यांनी २ फेब्रुवारी २०१४ रोजी ममता शिवतारे यांच्याशी विवाह केला. त्यांना आरा नावाची मुलगी आहे. ते आपल्या पगारातील ६० ते ७०% रक्कम गरीब मुलींचे सामूहिक विवाह आणि अकोल्यातील विद्यार्थ्यांसाठी कोचिंग क्लासेस आणि वसतिगृह चालवणाऱ्या संस्थेला दान करत असतात.

हे ही वाचा…

पहिल्याच प्रयत्नात UPSC क्रॅक, आता ‘लेडी सिंघम’ IPS काम्या मिश्राने का दिली राजीनामा, म्हणाली, ‘निर्णय कठीण पण…’