ips shivdeep lande: महाराष्ट्रातील रहिवाशी आणि सिंघम म्हणून ओळख असलेल्या आयपीएस शिवदीप लांडे बिहार केडरमध्ये आहेत. त्यांनी प्रशासकीय सेवेचा राजीनामा दिला आहे. राजीनामा दिल्यानंतर त्यांच्यातील आक्रमकपणा कायम आहे. आता त्यांनी बिहारमधील पूर्णिया जिल्ह्यातील खजांची हाट पोलीस ठाण्यातील सर्व कर्मचाऱ्यांचे निलंबन केले. तनिष्क शोरुममधील तीन कोटी ज्वेलर लूट प्रकरणात त्यांनी ही कारवाई केली. यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडली. तसेच त्यांनी एसडीपीओ विरुद्ध विभागीय चौकशी करण्याची शिफारस केली आहे.
पूर्णिया विभागाचे पोलीस महानिरीक्षकपदी (आयजी) शिवदीप लांडे यांचे महिन्याभरापूर्वी बदली करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी आयपीएसचा राजीनामा दिला होता. त्यांचा राजीनामा अद्याप मंजूर झाला नाही. आता आयजी शिवदीप लांडे यांनी पूर्णिया येथील जिल्हा पोलीस अधीक्षकांना पत्र लिहिले आहे. त्यात तनिष्क शोरुमधील ज्वेलरी मिळवण्यात आलेले अपयश आणि मुख्य आरोपींना अद्यापर्यंत न झालेल्या अटकेबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
26 जुलै रोजी पूर्णिया शहरातील बाजारपेठेत असलेल्या तनिष्क शोरुममध्ये भरदिवसा दरोडा पडला होता. त्यात दरोडेखोरांना 3.70 कोटींचा ऐवज लंपास केला होता. त्यासंदर्भात शिवदीप लांडे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, दुपारी 12 वाजता भरवस्तीत दरोडा पडला होता. त्यामुळे संपूर्ण पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांच्या कार्यशैलीवर प्रश्न निर्माण झाले आहे. शोरुमधील कर्मचाऱ्यांना बंधक बनवून तीन कोटींची लूट केली जाते. त्याला दोन महिने झाल्यावरही पोलीस आरोपींना पकडू शकत नाही. तीन कोटीच्या लुटीतील फक्त एक आंगठी जप्त करण्यात आली. पोलिसांकडे सर्व प्रकारच्या सुविधा असताना शोरुमजवळ गस्त होत नव्हती.
28 ऑगस्ट रोजी पोलीस मुख्यालयाकडून मागितलेला अहवाल अद्याप प्राप्त न झाल्याने महानिरीक्षकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. एवढ्या मोठ्या घटनेनंतरही अशा प्रकारची उदासीन वृत्ती पोलीस ठाण्याचे प्रमुख, सहायक पोलीस ठाणे आणि पोलीस ठाण्याचे सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची मनमानी दर्शवते, असे त्यांनी आपल्या पत्रात लिहिले आहे. एसडीपीओ पुष्कर कुमार यांच्यावर टिप्पणी करताना, आयजींनी लिहिले की त्यांना या घटनेबद्दल कोणतीही पूर्वकल्पना नव्हती किंवा त्यांचे पोलिस अधिकाऱ्यांवर कोणतेही नियंत्रण नव्हते. तसेच या घटनेनंतरही त्यांच्या स्तरावरून लुटलेले दागिने मिळवण्यासाठी कोणतीही स्वारस्य दाखवले नाही, ही बाब खेदजनक आहे.