Indian Railways Waiting Tickets: भारतीय रेल्वेने रोज कोट्यवधी प्रवासी प्रवास करतात. अनेक जण आरक्षित तिकीट करुन प्रवास करतात. त्यातील सर्वांना आरक्षित तिकीट मिळत नाही. अनेक जणांचे तिकीट वेटींगवर असते. वेटींग तिकीट रद्द केल्यावर एक प्रकारचे शुल्क आकारुन उर्वरित पैसे दिले जातात. त्यावेळी अनेकांना प्रश्न पडतो? तिकीट वेटींगवर आहे तर शुल्क का कापले जाते? असा प्रश्न अनेकांना पडतो. तसेच तिकीट कन्फर्म झाले नाही तरी संपूर्ण पैसे परत मिळत नाही. यासंदर्भात रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वेकडून कोणत्या प्रकारचे शुल्क आकारले जात आहे?
सरकारने लोकसभेत सांगितले की, रेल्वे मंत्रालय सर्व वेटींगवरील तिकिटांवर ‘क्लर्केज’ शुल्क आकारले जात आहे. तिकीट रद्द करण्यासह सर्व सोर्सकडून मिळणारा निधीचा वापर रेल्वेची देखभाल आणि ऑपरेशनल करण्यासाठी केला जात आहे. रेल्वे प्रवासी तिकीट रद्द करणे आणि त्याचा परतावा देण्यासाठी नियम 2015 आहे. त्यानुसार, आयआरसीटीसी वेबसाइटद्वारे रद्द केलेली सर्व वेटींग तिकिटावर क्लर्केज शुल्क आकारले जाते.
वेटींग तिकिटे असलेल्या प्रवाशांना अपडेट योजनेअंतर्गत ‘अपग्रेड’ करण्याचा किंवा पर्याय योजनेअंतर्गत पर्यायी ट्रेनमध्ये स्थलांतरित करण्याचा पर्याय आहे. रद्दीकरण शुल्कातून जमा झालेल्या महसुलाची आकडेवारी सरकारकडे आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलताना रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले, तिकीट रद्द केल्यामुळे जमा झालेली रक्कम वेगळी ठेवली जात नाही. त्यामुळे ती रक्कम सांगता येत नाही.
समाजवादी पक्षाचे खासदार इकरा चौधरी यांनी वेटींग तिकिटासंदर्भात प्रश्न लोकसभेत उपस्थित केला होता. त्यावर रद्दीकरण शुल्क कसे लागते? असे त्यांनी विचारले. सरकार हे शुल्क माफ करणार का? असा प्रश्न त्यांनी विचारला. वेटींग तिकीट का दिले जातात, त्यावर बोलताना वैष्णव यांनी सांगितले की, कन्फर्म किंवा आरएसी तिकीट रद्द झाल्यावर रिकाम्या राहणाऱ्या सीट भरण्यासाठी वेटींग तिकीट दिले जात असल्याचे सांगितले.