Mamata Banarjee:ममतादीदी भाजपाच्या जवळ येत आहेत का? जाणून घ्या दार्जिलिंगमध्ये दीदी, जगदीप धनखड आणि हेमंत बिस्वा यांच्यात झालेल्या मिटिंगबाबत.

| Updated on: Jul 22, 2022 | 9:49 PM

प. बंगालचे राज्यपाल धनखड आणि ममता बॅनर्जी यांच्यातील वादही जगजाहीर आहे, असे असतानाही ममता बॅनर्जी यांनी मार्गारेट अल्वा यांच्या पाठिंब्याचा निर्णय घेतलेला नाही. यामुळे राजकीय वर्तुळात ममता बॅनर्जी या भाजपाशी जुळवून घेत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

Mamata Banarjee:ममतादीदी भाजपाच्या जवळ येत आहेत का? जाणून घ्या दार्जिलिंगमध्ये दीदी, जगदीप धनखड आणि हेमंत बिस्वा यांच्यात झालेल्या मिटिंगबाबत.
ममतादीदींची भाजपाशी जवळीक?
Image Credit source: social media
Follow us on

नवी दिल्ली- राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विरोधकांचा एकत्र उमेदवार असावा, यासाठी प्रयत्नशील असलेल्या आणिते प्रत्यक्षात आणणाऱ्या ममता बॅनर्जी (Mamta Banarjee)आणि तृणमूल यांचे सूर सध्या बदले-बदलेसे झालेले आहेत. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत (Vice President Election) विरोधकांपासून दूर राहण्याचे संकेत ममता बॅनर्जी यांनी दिले आहेत. भाजपा विरोधी गटाला त्यामुळे चांगलाच धक्का बसला आहे. उपराष्ट्रपतीपदासाठी युपीएच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांना तृणमूल (Trinmool Congress)पाठिंबा देणार नाही, त्या निवडणुकीपासून तृणमूल दूर राहील अशी घोषणाच करण्यात आली आहे. उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराबाबत ममता बॅनर्जी यांचे मत जाणून घेतले नसल्याने हा निर्णय घेतला असल्याचे ममता दीदींनी स्पष्ट केले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार सोनिया गांधी यांनी उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवारासाठी ममता बॅनर्जी यांना दोनदा फोन केल्याची माहिती आहे. विरोधक ज्याही नावाची घोषणा करतील, त्यांना तृणमूल काँग्रेस पाठिंबा देईल, असे त्यावेळी ममतांनी सांगितल्याची माहिती आहे. शरद पवार आणि इतर विरोधकांच्या नेत्यांशी बोलतानाही त्यांनी याचाच पुनरुच्चारही केल्याचे सांगण्यात येते आहे. मात्र गुरुवारी त्यांनी अचानक भूमिका बदलत, या निवडणुकीपासून दूर राहण्याचा निर्णय जाहीर केला आहे. एनडीएचे उमेदवार जगदीप धनखड यांना पाठिंबा देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला नाही, असे तृणमूलकडून जोर देऊन स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र विरोधकांनी ममता यांच्या या निर्णयाशी दार्जिलिंगमध्ये झालेल्या भाजपा नेत्यांसोबतच्या ममतांच्या बैठकीशी जोडले आहे.

याच महिन्यात झाली होती दार्जिलिंगमध्ये मीटिंग

दार्जिलिंगमध्ये उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार आणि प. बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा आणि ममता बॅनर्जी यांच्यात एक बैठक पार पडली होती. याच बैठकीत ममता बॅनर्जी या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपासून दूर राहतील असा निर्णय झाल्याची शक्यता आहे. त्यांच्या या पवित्र्याने एनडीएच्या उमेदवाराचा विजय अधिक सुकर झाल्याचे मानण्यात येते आहे.

राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराबाबतही ममता बॅकफूटवर

तृणमूल काँग्रेसच्या या यू टर्नमुळे विरोधक हैराण झाले आहेत. यापूर्वी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवेळीही जर सरकारने द्रौपदी मुर्मु यांच्या नावाची आधी कल्पना दिली असती तर ममतांनी मुर्मू यांनाच पाठिंबा दिला असता अशी भूमिका घेतली होती. आता उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक ६ ऑगस्टला होते आहे. प. बंगालचे राज्यपाल धनखड आणि ममता बॅनर्जी यांच्यातील वादही जगजाहीर आहे, असे असतानाही ममता बॅनर्जी यांनी मार्गारेट अल्वा यांच्या पाठिंब्याचा निर्णय घेतलेला नाही. यामुळे राजकीय वर्तुळात ममता बॅनर्जी या भाजपाशी जुळवून घेत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.