रामपूर – एखाद्या गावात दहशतवादी संघटनेचे धमकीचे पत्र आले आणि त्यामुळे संपूर्ण गावाचा कारभार ठप्प झाला, हे ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. ही बाब पाकिस्तान किंवा अफगाणिस्थानात होईल, असेही तुम्हाला वाटू शकेल. पण प्रत्यक्षात भारतात, आपल्याच देशात हा प्रकार घडला आहे. उत्तर प्रदेशात रामपूर जिल्ह्यात अनुवा गावात सध्या संचारबंदी सदृश्य स्थिती आहे. या अनुवा गावाला दहशतवादी संघटना इसिसचे धमकीचे पत्र मिळाले आहे. त्यामुळे गेले आठवडाभर या गावातील लोक घरातून बाहेर पडू शकत नाहीयेत. काही जण तर घाबरलेल्या अवस्थेत घरबसल्या बेशुद्ध पडतायेत. ज्या घराच्या गेटसमोर एका लाल कपड्यात गुंडाळलेली ही चार पत्रे मिळालीत, त्या घराबाहेर 4 पोलीस तैनात करण्यात आले आहेत. या लिफाफ्यात 4 परिवारांतील 5 जणांची नावे लिहिलेली आहेत. तर पाचवे नाव हे एका 12 वर्षांच्या मुलाचे आहे. जो गेल्या 7 वर्षांपासून त्या गावातच राहत नाहीये. या पाच जणांसह संपूर्ण गावाला विषारी वायूने मारण्याची धमकी देण्यात आली आहे. पत्रात लिहिले आहे की- गावातल्या प्रत्येक व्यक्तीवर आमच्या एजंटची नजर आहे. 10 ऑगस्टही डेडलाईन आहे.
Newest BJP district Rampur gets ISIS threat. In letters addressed to a local, threats made to @AmitShah. Hope appropriate action will be taken. pic.twitter.com/YnH0yzqr61
हे सुद्धा वाचा— Heena B (@br_heena) July 23, 2022
अनुवा गावातील कुलदीप सिंह सकाळी शेतात पाणी सोडून घरी परतले होते. तेव्हा त्यांना घराच्या गेटबाहेर एका गिफ्ट पॅकमध्ये एका पिशवीत लपटलेली ही पत्रे मिळाली आहेत. त्या पिशवीत लाल लिफाफा होता. त्यावर अरबी भाषेत काहीतरी लिहिलेले होते. कुलदीप यांना वाटलं हे नजरचुकीने कुणाचं तरी पडलेलं आहे, त्यांनी तो लिफाफा शेतात कचराकुंडीत टाकून दिला. त्यावेळी गावातील काही जणांची नजर त्या लिफाफ्यावर पडली. त्यांनी तो लिफाफा उघडला तर त्यात चार पत्रं होती. ही पत्रं इंग्रजीत लिहिलेली आहेत, आणि शेवटी न समजणाऱ्या उर्दूत दोन ओळी काहीतरी लिहिलेले होते. गावात फारशी कुणाला इंग्रजी येत नाही, त्यातल्या त्यात ज्याला समजते त्याने ती पत्रे वाचली. त्यात जीवानी मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर सगळ्यांनी हे प्रकरण पोलिसांच्या कानावर घातले.
हे पत्र पाच जणांच्या नावाने लिहिलेले आहे. त्यात कुलदीप सिंह, भानुप्रताप सिंह, वीरपाल सिंह, 60 वर्षांच्या गीता शर्मा यांचे नाव लिहलेले आहे. गीता यांचा 12 वर्षांचा नातू भरत शर्मा याचेही नाव या पत्रात लिहिलेले आहे. ज्यावेळी भरत 4 महिन्यांचा होता, त्यावेळी त्याच्या वडिलांचा खून झाला होता. गेल्या आठ वर्षांपासून भरत त्याच्या आईसह दुसऱ्या गावी राहतो आहे, तिथेच त्याचे शिक्षणही सुरु आहे. या पत्रात लिहिले आहे की- तुम्हाला असे वाटत असेल की हे आपल्यासोबत काय होते आहे. मी तुम्हाला कोणत्याही क्षणी मारु शकतो. तुमच्या परिवारातील किंवा तुमच्या गावातील एक जण परदेशात आहे. त्याच्याकडे भारतीय गुप्तचर यंत्रणा रॉच्या गुप्तच विभागाने दिलेले पेन ड्राईव्ह आणि काही नकाशे आहेत. ते कोणत्याही परिस्थितीत आम्हाला हवे आहेत. असे झाले नाही तर गावातील एकही व्यक्ती जिवंत राहणार नाही. अशी धमकीच या पत्रात देण्यात आली आहे.
या पत्रात पुढे लिहिले आहे की- ते नकाशे आणि पेनड्राईव्ह 20 ऑगस्ट रोजी भारतात आणून गृहमंत्री अमित शाहा यांना देण्याचा प्लॅन आहे. ज्या व्यक्तीने ज्या अधिकाऱ्यांसोबत हा प्लॅन तयार केला आहे. त्या अधिकाऱ्यांना आम्ही खरेदी केले आहे. या देशात मंत्री, अधिकारी, न्यायाधीश सगळे विकण्यासाठी तयार आहेत, हे ती व्यक्ती विसरलेली दिसते आहे. मात्र याही परिस्थितीत ती व्यक्ती अमित शाहा यांच्यापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न नक्की करेल. असे झाले तर मी शपथ खाऊन सांगतो की गावातील एकही व्यक्ती जिवंत राहणार नाही. ती व्यक्ती, भारत सरकार, अमित शाहा किंवा योगी आदित्यनाथ कुणीही तुम्हाला वाचवू शकणार नाही. सरीन गॅस गाात ठेवण्यात आला आहे. माझे एजेंट्स गावातील प्रत्येक व्यक्तीवर नजर ठेऊन आहेत. तुमच्याकडे 10 ऑगस्टपर्यंतची वेळ आहे. त्याला थांबवा. लिफाफ्याच्यावर असलेला लाल कपडा हा मृत्यूचे आमंत्रण आहे.
अमेरिकेचे माजी परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांच्या माहितीनुसार, 21 ऑगस्ट 2013 साली सीरियाच्या दश्मिकमध्ये सरीन गॅसचा वापर करण्यात आला होता. या हल्ल्यात 1400 हून अधिक जण मारले गेले होते. हा रासायनिक गॅस सायनाईडपेक्षाही भयंकर असतो. या गॅसने कोणतीही व्यक्ती 15 मिनिटांत मरुन जाते, असे या विषयातील तज्ज्ञ सांगतात.
पत्रात पुढे लिहिले आहे की – त्या व्यक्तीने तो पेनड्राईव्ह आणि नकाशे अमित शाहा यांना देण्याऐवजी आमच्या व्यक्तीच्या सुपूर्द केले तर गावातील नागरिकांचा जीव वाचेल. आमचे एजेंट दोन दिवसांत 2 कोटी रुपये तुमच्या घरी पोहचवतील. त्या व्यक्तीला जगात कोणत्याही देशात उच्चस्तरीय नोकरीही देण्यात येईल. मात्र ही माहिती पोलीस किंना दुसऱ्या सुरक्षा यंत्रणांना दिली तर ते तुमच्यासाठी योग्य असणार नाही. तो पेनड्राईव्ह आणि मॅप तर आम्ही मिळवूनच राहू. तुम्हाला वाटत असेल की हे तुमच्यासोबत का होते आहे, कारम तुम्ही त्या व्यक्तीला ओळखता. सरीन गॅसची बाब डोक्यात ठेवा. एक छोटीशी चूकही अनेकांचे जीव घेऊ शकेल.
या पत्रानंतर गुप्तचर यंत्रणा आणि स्पेशल ऑपरेशन ग्रुप गावात पोहचले आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येते आहे. पोलीस अधीक्षकांनी गावात येून गावकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. पत्रावर इसिसचे नाव आहे, हे गंभीर प्रकरण आहे, मात्र गावकऱ्यांनी घाबरण्याची गरज नाही, असे पोलीस अधीक्षकांनी सांगितलेले आहे. धमकी मिळाल्यानंतर कुलदीपचा भाऊ बेशुद्ध पडला. कुलदीप सांगतायेत की पेनड्राईव्हचे नावच आम्ही पहिल्यांदा ऐकतो आहोत. सध्या घरातील जनावरं भुकेली आहेत, त्यांच्यासाठी चारा आणण्यासाठी जायची हिंमतही गावात कुणाची नाही. या पत्रात नावे असणाऱ्यांना नेमकं मागितलं काय आहे हेच माहित नाही. पत्रात काय लिहिलंय हेही माहित नाही, फक्त 10 ऑगस्टपर्यंत त्यांच्या जीवाला धोका आहे, हेच त्यांना माहित आहे. गावात सध्या तणावपूर्ण भीती आहे. चार जणांना धमकी आलीये, एवढेच गावकऱ्यांना माहिते आहे. पत्र पूर्ण गावासाठी आहे हेही त्यांना माहित नाही. या गावातील कुणी परदेशात राहतंय का, हेही अद्याप स्पष्ट झालेलं नाही. तपासात असं कोणतंच नावही समोर आलेलं नाहीये.