पणजी : इस्रायल सध्या संकटात आहे. हमासने त्यांच्यावर इतिहासातील सर्वात मोठा हल्ला केला. शेकडो इस्रायली नागरिकांनी या हल्ल्यात आपले प्राण गमावले. इस्रायलने सर्वप्रथम आपली सीमा सुरक्षित करायला प्राधान्य दिलं. त्यानंतर आता इस्रायल हमास विरोधात मोठी कारवाई करण्याच्या तयारीत आहे. इस्रायलकडून सध्या फक्त हवाई हल्ले सुरु आहेत. लवकरच इस्रायली सैन्य गाझा पट्टीत घुसू शकतं. त्यावेळी प्रत्यक्ष जमिनीवरच्या आमने-सामनेच्या लढाईला सुरुवात होईल. इस्रायलमध्ये ही परिस्थिती निर्माण होण्याआधी काही इस्रायली पर्यटक फिरण्यासाठी म्हणून भारतात आले होते. हे इस्रायली पर्यटक आता आपली टूर अर्ध्यावरच सोडून पुन्हा मायदेशी परतण्याच्या तयारीत आहेत. इस्रायली सैन्यासोबत काम करण्यासाठी म्हणून हे पर्यटक निघाले आहेत. त्यांना कोणी सांगितलेल नाही, देशसेवेसाठी स्वेच्छेन ते हे करत आहेत.
बुधवारी गोव्याच्या छाबड हाऊसमध्ये इस्रायली पर्यटक जमले होते. हे सर्व पर्यटक इस्रायलला जाणाऱ्या विमानांच्या वेळापत्रकाची चौकशी करत होते. युद्धामुळे तेल अवीवला जाणारी काही विमान रद्द करण्यात आली आहेत. “गोव्यातून बाहेर पडल्यानंतर पहिल विमान पकडून मला इस्रायलला जायच आहे. मला माझ्या शहरात जाऊन सैन्याला मदत करायची आहे” असं इतामारने (27) सांगितलं. तो इस्रायली सैन्य दलात होता. गाझा पट्टीपासून काही किलोमीटर अंतरावरील शहरात तो राहतो. हमासच्या दहशतवाद्यांनी याच दक्षिण इस्रायलच्या भागात घुसून धुमाकूळ घातला होता.
इतामारने काय सांगितलं?
“मी आठवड्याभरापूर्वी इथे आलो. पण मला आता टूर अर्ध्यावर सोडून परतायच आहे. मला माझ्या देशाची आणि देशवासियांची सेवा करायची आहे. मी हिंसाचाराची जी दृश्य पाहिली, ते खूपच भयानक होतं. मित्रपरिवार आणि कुटुंबीयांची ख्यालीखुशालीची सतत चौकशी सुरु आहे. काही जणांना दुसऱ्या सुरक्षित स्थळी हलवण्यात आलय” असं इतामारने सांगितलं.
‘प्रत्येक तासाला आमच्या कानावर अशा बातम्या’
संरक्षण दलाच्या स्पेशल युनिटमध्ये तीन वर्ष काम करण्याचा इतामारकडे अनुभव आहे. “हमासच्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात माझे पाच वर्गमित्र आणि शिक्षकाचा मृत्यू झाला. दहा जण बेपत्ता आहेत. प्रत्येक तासाला आमच्या कानावर अशा बातम्या येत आहेत” असं इतामारने सांगितलं.
‘त्यांना किडनॅप करण्यात आलय असं मला वाटत’
इस्रायलमध्ये राहणारी तामर शाहर (26) पेशाने सोशल मीडिया मॅनेजर आहे. फोनवरुन ती वडिलांबरोबर बोलत होती, त्यावेळी तिला सायरनचा आवाज ऐकू आला. “मला स्फोटाचा आवाज ऐकू आला. तो आवाज वाढतच चालला होता. मला खूप भीती वाटली. माझी भावंड, पालक आणि आजी आमच्या जुन्या घरात जमले आहेत. रॉकेट हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी तिथे शेल्टर सुद्धा नाहीय. माझे दोन मित्र बेपत्ता आहेत. त्यांना किडनॅप करण्यात आलय असं मला वाटत” असं तामर शाहर म्हणाली.