नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काल फोनवरुन इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्याशी चर्चा झाली. त्यावेळी भारत तुमच्यासोबत आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलच्या पंतप्रधानांना सांगितलं. आता यावर ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाची प्रतिक्रिया आली आहे. मागच्या चार दिवसांपासून गाझा पट्टीत इस्रायल आणि हमासच्या दहशतवाद्यांमध्ये घनघोर युद्ध सुरु आहे. आतापर्यंत हजारो लोकांचा मृत्यू या युद्धात झाला आहे. शनिवारी हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायमध्ये घुसून अक्षरक्ष: हैदोस घातला. लहान मुलं, महिला, वयोवृद्ध नागरिक यांच्यावर अत्याचार केले. बेछूट गोळीबार केला. बंधक बनवलं. हमासने इतिहासातील सर्वात भयानक हल्ला इस्रायलयवर केला. हमासची एवढी हिम्मत होईल, याची इस्रायलने सुद्धा कल्पना केली नव्हती. आता इस्रायलने प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली आहे.
इस्रायलवर झालेल्या या हल्ल्यानंतर भारत सरकारने थेट भूमिका घेतली. इस्रायलला आपला पाठिंबा जाहीर केला. आता ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने इस्रायलने पॅलेस्टाइनवर केलेल्या हल्ल्यासंदर्भात प्रेस नोट जारी केलीय. “हमासचा हल्ला हा इस्रायलने केलेल्या अत्याचारावर स्वाभाविक प्रतिक्रिया होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या परंपरेकडे दुर्लक्ष केलं. शोषितांऐवजी जुलूम करणाऱ्यांच समर्थन केलं. ही बाब संपूर्ण देशासाठी लज्जासपद आणि दु:खद आहे. हमास-इस्रायल युद्धाच खर कारण इस्रायल आहे. पॅलेस्टाइनने फक्त त्यांच्यावर होणाऱ्या जुलूमापासून स्वत:चा बचाव केलाय” असं ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने म्हटलं आहे.
‘कुनूत-ए-नजिला वाचा’
तात्काळ युद्ध बंदी हाच यावर तोडगा असल्याच ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने आपल्या लेटरमध्ये म्हटलं आहे. ‘पॅलेस्टिनीसाठी प्रार्थना करा आणि कुनूत-ए-नजिला वाचा’ असं मौलाना रहमानी यांनी मुस्लिमांना अपील केलय. “या कठीण काळात भारतीय नागरीक दृ्ढतापूर्वक इस्रयलाच्या पाठिशी उभे आहेत” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी नेतन्याहू यांना म्हणाले. हमास विरोधात कारवाई सुरु आहे, त्या संदर्भात नेतान्याहू यांनी मोदींना फोनवरुन माहिती दिली.