Israel vs Iran : जगात सध्या अनेक देशांमध्ये परस्पर वाद आहेत. रशिया आणि युक्रेन यांच्यात गेल्या अनेक महिन्यांपासून युद्ध सुरु आहे. ज्यामध्ये आतापर्यंत दोन्ही देशांमधील हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे इस्रायल आणि हमास यांच्यात देखील युद्ध सुरु आहे. इस्रायलकडून गाझामध्ये हल्ले केले जात आहे. हमासच्या दहशतवाद्यांना लक्ष्य करण्यासाठी इस्रायलने अनेक हल्ले केलेत ज्यामध्ये मोठी हानी झाली आहे. त्यातच आता भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने इराण आणि इस्रायलमध्ये प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी ॲडव्हायजरी जारी केलीये. पुढील सूचना मिळेपर्यंत सर्व भारतीयांना इराण किंवा इस्रायलला न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
परराष्ट्र मंत्रालयाने सध्या इराण किंवा इस्रायलमध्ये राहणाऱ्या सर्व लोकांना तेथील भारतीय दूतावासाशी संपर्क साधून आपली नोंदणी करून घेण्याची विनंती केली आहे. इराण आणि इस्रायल संदर्भात भारत सरकारने सर्व भारतीयांना पुढील सूचना मिळेपर्यंत इराण किंवा इस्रायलला प्रवास न करण्याचे निर्देश दिले आहेत.
Travel advisory for Iran and Israel:https://t.co/OuHPVQfyVp pic.twitter.com/eDMRM771dC
— Randhir Jaiswal (@MEAIndia) April 12, 2024
पुढील ४८ तासांत इराण इस्रायलवर हल्ला करू शकतो, असे वृत्त असल्याने ही ॲडव्हायजरी जारी करण्यात आली आहे. वॉल स्ट्रीट जर्नलने देखील असे वृत्त याआधी दिले आहे. सीरियातील इराणच्या वाणिज्य दूतावासाची इमारत उद्ध्वस्त झाल्याने दोन्ही देशांमधील तणाव शिगेला पोहोचलाय.
इस्रायल युद्धाच्या तयारीत
इराणकडून कोणत्याही क्षणी हल्ल्याची स्थिती असताना इस्रायल देखील तयार असल्याचं बोललं जात आहे. इस्रायलने म्हटले आहे की गाझामध्ये सुरू असलेल्या लष्करी कारवाईदरम्यान पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू म्हणाले, ‘आम्ही संरक्षण आणि हल्ला या दोन्ही बाबतीत इस्रायलच्या सुरक्षा गरजा पूर्ण करण्याची तयारी करत आहोत.’
अमेरिकेतील वृत्तवाहिन्यांनी दिलेल्या बातमीनुसार, इराण इस्रायलवर थेट हल्ला करण्याची शक्यता कमी आहे. तो लेबनॉनमधील हिजबुल्ला आणि येमेनमधील हुथी सारख्या संघटनांचा यासाठी वापर करू शकतो. ब्लूमबर्गच्या अहवालात उच्च अधिकाऱ्यांचा हवाला देत म्हटले आहे की, इराण आगामी काळात इस्रायलवर मोठा हल्ला करू शकतो.