आदित्य L1 ने घेतला सूर्याचा पहिला फुल डिस्क फोटो…आदित्य 7 जानेवारीपर्यंत लँगरेंज पॉइंट

| Updated on: Dec 09, 2023 | 8:03 AM

Aditya L1 Mission: भारताची महत्त्वाकांक्षी सौरमोहीम आदित्य एल 1 आपल्या इच्छित स्थळाकडे वेगाने वाटचाल करत आहे. त्याचवेळी इस्त्रोकडून महत्वाची बातमी आली आहे. आदित्य एल 1 ने पहिला फुल डिस्क फोटो पृथ्वीकडे पाठवला आहे.

आदित्य L1 ने घेतला सूर्याचा पहिला फुल डिस्क फोटो...आदित्य 7 जानेवारीपर्यंत लँगरेंज पॉइंट
Follow us on

नवी दिल्ली | 9 डिसेंबर 2023 : भारताची महत्त्वाकांक्षी सौरमोहीम आदित्य एल 1 च्या सोलर अल्ट्रॉवायलेट इमेजिंग टेलीस्कोप म्हणजेच ‘ पेलोड सूट’ उपकरणाने डोळे उघडले आहे. सूटने रंगी बिरंगी पहिला फुल डिस्क फोटो पृथ्वीकडे पाठवला आहे. हा फोटो काढण्यासाठी दुर्बिनीने 11 फिल्टरचा वापर केला. आदित्यचा सूर्याकडील नियोजित स्थळाकडे सुरू असतानाच ही कामगिरी यशस्वी झाली. पुण्यातील आंतरविद्यापीठीय खगोलशास्त्र आणि भौतिकी (आयुका) केंद्राने विकसित केलेले हे उपकरण म्हणजे मराठी अभियंत्यांचा सहभाग असलेला आविष्कार आहे. इस्त्रोने शुक्रवारी X वर फोटो शेअर केले.

कधी निघाले होते आदित्य एल1

इस्त्रोने शेअर केलेल्या फोटोसोबत म्हटले आहे की, सनस्पॉट, ब्लॅक स्पॉट, सूर्यचे शांत क्षेत्र यामधून दिसत आहे. सूर्याची रहस्य शोधण्यासाठी 15 लाख किलोमीटरच्या प्रवासाला आदित्य एल 1 दोन सप्टेंबर रोजी निघाले. आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस स्टेशनमधून पोलर सॅटेलाइट व्हीकल आदित्य L1 मिशन लॉन्च करण्यात आले होते. आदित्य L1 सात जानेवारी 2024 पर्यंत लॅगरेंज पॉइंटवर पोहचण्याची शक्यता आहे. इस्त्रोने 20 नोव्हेंबर 2023 एसयूआयटी पेलोड सक्रीय केला होता. या टेलीस्कोपने पहिल्यांदा सहा डिसेंबर 2023 रोजी पहिला फोटो घेतला होता. आता पहिली पूर्ण डिस्क फोटो घेण्यात आला. यामुळे आता सूर्याच्या फोटोस्फेयर आणि क्रोमोस्फेयरचा अभ्यास करण्यास मदत मिळणार आहे.

सूर्याच्या विविध स्तरावरील फोटो मिळणार

आदित्य एल १ कडून सूर्याची पहिली प्रतिमा झाल्यानंतर वैज्ञानिक आणि अभियंत्यांनी एकच जल्लोष केला. आजपर्यंत सुर्याच्या प्रभामंडळातील किंवा पृष्ठभागावरील प्रतिमा मिळत होत्या. सूट उपकरणामुळे सूर्याच्या विविध स्तरातील फोटो प्राप्त होत आहेत. या उपकरणात २०० ते ४०० नॅनोमीटर तरंगलांबी श्रेणीमध्ये कार्यरत असलेली ११ विशेष फिल्टर लावले आहेत. सूर्याच्या फोटोस्फियर आणि क्रोमास्फियरच्या उच्च रिझोल्यूशन प्रतिमा मिळणार आहे. आता मिळालेल्या प्रतिमेत तीन वेगवेगळी फिल्टर वापरुन उपलब्ध झाली आहे.

पुण्यात जल्लोष

‘आयुका’तील सूट उपकरणाची संकल्पना जरी देशभरातून आलेल्या शास्त्रज्ञांची असली, तरी त्याला प्रत्यक्षात उत्तरविणारे अनेक अभियंते हे मराठी आहेत. या उपकरणावर अभियंते १० वर्षांपासून कार्यरत असून, त्यासाठीचे अनेक छोटी उपकरणे आणि अत्याधुनिक सुविधा आयुकात निर्माण केल्या आहेत.