अयोध्या, दि.20 जानेवारी 2024 | अयोध्येतील राम मंदिरात २२ जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा सोहळा होत आहे. या मंदिराच्या आकर्षक वास्तू रचनेकडे जगाचे लक्ष लागले आहे. मंदिराची निर्मिती करताना अनेक नवीन प्रयोग प्रथमच करण्यात आले होते. त्यासाठी इस्त्रोचे वैज्ञानिक आणि आयआयटीच्या अभियंत्यांची मदत घेतली गेली आहे. आधुनिक विज्ञान आणि पारंपारिक वास्तुकला यांच्या मिश्रणातून सर्वात सुंदर राम मंदिराची उभारणी झाली आहे. राम मंदिरास एक हजार वर्षांपर्यंत काहीच होणार नाही, असे श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी सांगितले.
मंदिराचा आरखडा तयार करण्यासाठी देशातील वैज्ञानिकांचे मोठे योगदान आहे. यापूर्वी असे कधीच झाले नाही. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो) आणि इंडियन इंस्ट्रट्यूट ऑफ टेक्नॉलाजी (आयआयटी) मधील अभियंत्यांची मदत झाली. चंद्रकांत सोमपुरा यांनी नागर शैलीत या मंदिराचे डिझाइन तयार केले आहे. सोमपुरा परिवार जवळपास पंधरा पिढ्यांपासून हे काम करत आहेत. या परिवाराने देशभरातील शंभरपेक्षा जास्त मंदिरांचे डिझाइन तयार केले आहेत. सोमपुरा म्हणतात, ‘वास्तुकलेच्या इतिहासात राम मंदिर सर्वश्रेष्ठ आहे. पृथ्वीवर इतक शानदार रचना यापूर्वी झाली नाही.’
मंदिर 2.7 एकरमध्ये तयार करण्यात आले आहे. 57,000 वर्ग फूट असलेले हे मंदिर तीन मजली आहे. त्यासाठी कुठेही लोखंडाचा वापर करण्यात आला नाही. कारण लोखंडाचे वय फक्त 80-90 असते. तसेच सिमेंट किंवा चुन्याचा वापर नाही. ग्रेनाइट, बलुआ दगड आणि संगमरमरचा वापर केला आहे.
मंदिराच्या खाली असलेली जमीन वाळू असलेली होती. तसेच एका ठिकाणी सरयू नदी मंदिराच्या ठिकाणाजवळून वाहत होती. यामुळे आणखी मोठे आव्हान होते. या समस्येवर शास्त्रज्ञांनी एक अनोखा उपाय शोधून काढला आहे. प्रथम मंदिराच्या संपूर्ण परिसराची माती 15 मीटर खोलीपर्यंत खणण्यात आली. या भागात 12-14 मीटर खोलीपर्यंत इंजिनीअरकडून तयार करण्यात आलेली माती टाकण्यात आली होती. कोणत्याही स्टीलचा वापर करण्यात आला नाही. ते घन खडकासारखे दिसण्यासाठी पायाचे 47 थर कॉम्पॅक्ट केले गेले.
हे ही वाचा
राम मंदिर प्राणप्रतिष्ठापूर्वी मोठी चूक, ट्रस्टकडून कठोर कारवाईची तयारी