बंगळुरु : “प्रज्ञान रोव्हर आणि विक्रम लँडर चंद्रावर व्यवस्थित काम करतायत. चंद्रावर रात्र सुरु होईल, त्याआधी त्यांना स्लीप मोडवर टाकण्यात येईल” असं इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी सांगितलं होतं. त्यानंतर काही तासातच भारतीय अवकाश संशोधन संस्था ISRO कडून प्रज्ञान रोव्हरने त्याची सर्व निर्धारित उद्दिष्टय पूर्ण केली आहेत, त्याला आता स्लीप मोडवर टाकण्यात आलं आहे, असं जाहीर केलं. “रोव्हरने त्याच काम पूर्ण केलय. त्याला व्यवस्थित पार्क करुन स्लीप मोडवर टाकण्यात आलय. APXS आणि LIBS हे पेलोड म्हणजे उपकरण बंद करण्यात आली आहेत. या पेलोड्समधील डाटा लँडरच्या माध्यमातून पृथ्वीवर पाठवण्यात आला” असं इस्रोने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर जाहीर केलं. आधी एक्स टि्वटर म्हणून ओळखलं जात होतं.
भारताच्या चांद्रयान-3 मधील विक्रम लँडरने 23 ऑगस्टला संध्याकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चंद्रावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग केलं. इस्रोने एक नवीन इतिहास रचला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा भारत जगातील पहिला देश ठरला. चंद्रावर उतरणारा भारत जगातील चौथा देश आहे. याआधी फक्त अमेरिका, रशिया आणि चीन या देशांनाच अशी कामगिरी करता आली आहे. भारताने चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केल्याचा रविवारी 12 वा दिवस होता. कदाचित विक्रम आणि प्रज्ञान आता कायमचे रिटायर होतील. चांद्रयान-3 चे प्रोजेक्ट डायरेक्टर पी. वीरामुथुवेल यांनी TOI शी बोलताना या प्रोजेक्टबद्दल महत्त्वाची माहिती दिली. विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरमधील उपकरण सौर ऊर्जेवर चालणारी होती. त्यांना सूर्यप्रकाशाची गरज होती. सूर्यप्रकाशाशिवाय ही उपकरण काम करु शकत नाही. त्यामुळे रात्रीच्यावेळी ही उपकरण बंद करणं गरजेच आहे.
14 दिवसांच्या आधीच का बंद केलं?
महत्त्वाच म्हणजे या उपकरणांची निर्मिती 14 दिवसांच्या हिशोबानेच करण्यात आली आहे. चंद्रावर रात्रीच्यावेळी गोठवून टाकणारी थंडी असते. त्यानंतर ही उपकरण चालण्याची शक्यता कमी आहे. पण ही उपकरण चालू झाली, तर तो एक चमत्कारच ठरेल. लँडर आणि रोव्हरच आयुष्य 14 दिवसाच असताना त्याआधीच त्यांना बंद का करण्यात आलं? असा प्रश्न अनेकांच्या मनात येईल.
प्रोजेक्ट डायरेक्टर पी. वीरामुथुवेल यांनी काय सांगितलं?
त्यावर चांद्रयान-3 चे प्रोजेक्ट डायरेक्टर पी. वीरामुथुवेल यांनी काय उत्तर दिलय ते वाचा. “चंद्रावर सूर्योदय होतो, ते पहिले दोन दिवस आणि शेवटचे दोन दिवस पकडत नाही. 22 ऑगस्टला चंद्रावर दिवस सुरु झाला होता. दुसऱ्यादिवसाच्या अखेरीस आपण चंद्रावर लँडिंग केलं. तिथून विक्रम आणि प्रज्ञानने आमच्या अपेक्षेपेक्षा पण चांगलं काम केलय. मिशनची सर्व उद्दिष्ट्य पूर्ण झाली आहेत. रविवारी लँडर आणि रोव्हर स्लीप मोडवर जातील”