बंगळुरु : आदित्य L 1 मिशन आज लॉन्च होणार आहे. सगळ्यांचच या मोहीमेकडे लक्ष लागलं आहे. चांद्रयान-3 च्या यशाने संपूर्ण देशात उत्साह आहे. आदित्य L 1 ही भारताची पहिली सूर्य मोहीम आहे. आज सकाळी 11 वाजून 50 मिनिटांनी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अवकाश तळावरुन आदित्य एल 1 च लॉन्चिंग होणार आहे. हे लॉन्चिंग याची देहा, याची डोळा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोक श्रीहरीकोटा येथे जमले आहेत. पृथ्वीपासून 15 लाख किमी अंतराचा प्रवास करुन आदित्य सूर्याजवळच्या कक्षेत प्रवेश करेल. त्यासाठी 125 दिवस लागतील. इतके दिवस लागणार त्यावरुनच ही मोहीम किती आव्हानात्मक आहे ते लक्षात येतं. सूर्य आणि पृथ्वीच्यामध्ये एक पॉइंट आहे, L1 तिथे आदित्यला स्थापित केलं जाईल. या मिशनद्वारे सूर्याबद्दलच्या बऱ्याच आतापर्यंत माहित नसलेल्या घडामोडी आपल्याला समजतील. आदित्य L 1 ही एकप्रकारने सूर्याजवळची आपली वेधशाळा असेल.