कानपूरः अखेर अत्तराचा व्यापारी पीयूष जैनच्या घरी सुरू असलेली छापेमारी थांबली आहे. त्याच्या कन्नौज येथील घरी 4 मोठ्या खोक्यांमध्ये तब्बल 19 कोटी रुपयांचे घबाड आणि 23 किलो सोने सापडले आहे. हे सोने महसूल गुप्तचर संचालनालयाकडे सोपवण्यात आले आहे. जीएसटी इंटेलिजन्स महासंचालनालयाने ही सर्वात मोठी रोकड वसुली असल्याचे म्हटले आहे. जैनकडे आतापर्यंत एकूण 276 कोटींची रोख रक्कम सापडली आहे. सोने, चांदी आणि जडजवाहिरे वेगळेच.
पंचनामा पूर्ण
जीएसटी इंटेलिजन्स महासंचालनालयाचे अतिरिक्त निदेशक जाकीर हुसैन यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीयूष जैनच्या कन्नौज येथील घरी सुरू असलेला पंचनामा पूर्ण झाला आहे. याप्रकरणी चौकशी सुरू आहे. जैनच्या घरातून 19 कोटी रुपयांची रोकड मिळाली आहे. विशेष म्हणजे त्याच्या कानपूरच्या घरीही 257 कोटींची रोकड, 25 किलो सोने आणि 250 किलो चांदी सापडली आहे. जैनला सध्या न्यायालयीन कोठडी सुनावली आहे, अशी माहिती त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
असे झाले उघड
कानपूरचा पीयूष जैन. बडी हस्ती. अत्तराचा व्यापार. सगळीकडे वचक आणि मानमरातब औरच. या जैनच्या कंपनीचा एक ट्रक अहमदाबादमध्ये पकडण्यात आला. तेव्हा ट्रकमधील सामानांचे बिल बोगस आढळले. त्यावर कंपन्यांची नावे खोटी होती. शिवाय सर्व बिले पन्नास हजारांच्या आतील. त्याला कारण Eway Bill भरायची गरज पडू नये हे होते. याच सुगाव्यावरून जैन याच्या कानपूर येथील घरात छापा टाकण्यात आला होता.
खटारा गाडीत फिरायचा
पीयूष जैन अतिशय चलाख होता. आपल्याकडे भरपूर पैसा हे लोकांना समजू नये म्हणून तो भुक्कड रहायचा. खटारा गाड्यात फिरायचा. त्याच्याकडे फक्त दोन जुन्या चारचाकी गाड्या आहेत. त्याच गाड्या घेऊन सगळीकडे जायचा. त्यामुळे तो इतरांना खूप साधा वाटायचा. मात्र, त्याची संपत्ती अक्षरशः कुबेरालाही लाजेवल अशी निघाल्याचे पाहून साऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
शाह यांची अखिलेशवर टीका
भाजप नेत्यांनी अत्तराचा व्यापारी पीयूष जैनचे समाजवादी पक्षासोबत संबंध असल्याचे म्हटले आहे. गृहमंत्री अमित शाह यांनी यावरून अखिलेश सिंह यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, अखिलेश यांचे पोट दुखत आहे. ते आता राजकारणाच्या द्वेषातून छापेमारी झाल्याचे म्हणत आहेत. मात्र, त्यांना यावर काय उत्तर द्यावे हे कळत नाही, असा आरोप त्यांनी केला आहे.
योगी सरकारचा प्रताप; शायरांची नावे बदलून नव्या वादाला तोंड…अकबर इलाहाबादींचे केले प्रयागराजी