India – Pakistan : SCO शिखर परिषदेसाठी भारताचे परराष्ट्र मंत्री मंगळवारी पाकिस्तानला गेले होते. भारताकडून एस जयशंकर हे प्रतिनिधी म्हणून गेले होत. पाकिस्तानमधून ते बुधवारी भारतात परतले. जयशंकर यांनी पाकिस्तानी नेत्यांशी द्विपक्षीय चर्चा केली नाही, परंतु त्यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि इतर नेत्यांशी अनौपचारिक चर्चा केली. एस जयशंकर यांनी इस्लामाबादहून दिल्लीला परतताना आदरातिथ्याबद्दल शहबाज शरीफ आणि पाकिस्तान सरकारचे आभार मानले. अशा स्थितीत दोन्ही देशांमधील संबंध सामान्य होऊ शकतात का असा प्रश्न विचारला जात आहे.
फायनान्शियल एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, एससीओ शिखर परिषदेसाठी एस जयशंकर यांचा पाकिस्तान दौरा विशेष आहे. कारण जवळपास एक दशकानंतर कोणता भारतीय प्रतिनिधी पाकिस्तानात गेला होता. यापूर्वी 2015 मध्ये तत्कालीन परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज हार्ट्स ऑफ एशिया समिटमध्ये सहभागी होण्यासाठी इस्लामाबादला गेल्या होत्या. त्यानंतर आता एस जयशंकर गेल्यावर जगाच्या नजरा त्यांच्या दौऱ्यावर खिळल्या होत्या. कारण भारत-पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय संबंध गेल्या अनेक महिन्यांपासून बिघडले आहेत.
एससीओची बैठक अशा वेळी झाली जेव्हा पाकिस्तानचे राजकारण चांगलेच तापले आहे. तुरुंगात असलेले माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पक्षाचे कार्यकर्ते सरकारविरोधात सातत्याने निदर्शने करत आहेत. अनेक पाकिस्तानी राजकारण्यांनी यासाठी भारताला जबाबदार धरले आहे. एससीओच्या बैठकीपूर्वीच्या या गोष्टींमुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संभाव्य द्विपक्षीय सहभागाच्या आशाच क्षीण झाल्या.
अलिकडच्या वर्षांत SCO चा विस्तार झाला आहे. भारत, इराण, कझाकिस्तान, चीन, किर्गिस्तान, रशिया, पाकिस्तान, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान हे पूर्ण सदस्य आहेत. तर अफगाणिस्तान, बेलारूस आणि मंगोलिया हे तीन देश SCO चे निरीक्षक आहेत आणि अझरबैजान, आर्मेनिया, बहरीन, कंबोडिया, इजिप्त, कुवेत, मालदीव, म्यानमार, नेपाळ, कतार, सौदी अरेबिया, श्रीलंका, तुर्की आणि UAE – चौदा भागीदार आहेत.
SCO सदस्य देश हे जागतिक लोकसंख्येच्या 40 टक्के आणि जगाच्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या 32 टक्के प्रतिनिधित्व करतात. असे असूनही, त्याच्या दोन प्रभावशाली सदस्यांमधील (भारत-पाकिस्तान) तणावामुळे त्याची परिणामकारकता कमकुवत होते. जयशंकर यांच्या भेटीवरून तज्ज्ञांना आशा आहे की ही भेट सहकार्याला चालना देणार नाही परंतु मतभेद मागे ठेवण्यास उपयुक्त ठरेल.