नवी दिल्ली | 9 फेब्रुवारी 2024 : समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन संसदेच्या बजेट सत्रादरम्यान चांगल्याच संतापलेल्या बघायला मिळाल्या. विशेष म्हणजे राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांच्यासोबतही बोलताना त्या आक्रमक झालेल्या बघायला मिळाल्या. त्यामुळे त्या चांगल्याच चर्चेत आल्या होत्या. पण आता जया बच्चन यांनी भस सभागृहात माफी मागितली आहे. जया बच्चन यांचा राज्यसभेचा कार्यकाळ आता संपत आहे. त्यामुळे राज्यसभेतील त्यांच्या समारोपच्या भाषणात त्यांनी सर्वांची मनापासून माफी मागितली. आपला स्वभाव तापट आहे, पण आपला हेतू हा कुणाचंही मन दुखावण्याचा नव्हता, असं जया बच्चन यावेळी स्पष्ट करतात. “लोक मला नेहमी प्रश्न विचारतात की, मला इतका राग का येतो? पण तो माझा स्वभाव आहे. मी स्वत:ला नाही बदलू शकत. मला कोणती गोष्ट आवडत नाही किंवा मी त्याल गोष्टीशी सहमत नसेल तर मी माझा स्वत:वरचा ताबा राहत नाही”, असं जया बच्चन आपल्या भाषणात म्हणाल्या.
“माझ्याकडून चुकून कळत-नकळत मन दुखावलं गेलं असेल, कुणाला ते खूप पर्सनली लाग असेल तर माफी मागते”, असं जया बच्चन म्हणाल्या. राज्यसभेच्या 68 सदस्यांचा कार्यकाळ आता संपत आहे. या सदस्यांमध्ये जया बच्चन यांचादेखील समावेश आहे. यावेळी संसेदीत आपल्या शेवटच्या भाषणात जया बच्चन यांनी त्यांच्या 20 वर्षांच्या अनुभवाविषयी भाष्य केलं. “आयुष्यातील 20 वर्ष हा कार्यकाळ खूप मोठा आहे. मला अनेक चांगले-वाईट अनुभव आले. सर्वात चांगला अनुभव हा राहिला की माझं कुटुंब खूप मोठं झालं”, असं जया बच्चन म्हणाल्या.
“माझे सहकारी मला नेहमी प्रश्न विचारतात की, तुम्ही इतक्या का संतापतात? मी काय करु, माझा स्वभावच तसा आहे. जी गोष्ट मला चुकीची वाटते ती मला मुकाट्याने सहन करु शकत नाही. त्यावर मी लगेच बोलून टाकते. माझ्या शब्दांमुळे कुणाचं मन दुखावलं असेल तर मी माफी मागते”, असं जया बच्चन म्हणाल्या. “मी प्रार्थना करते की, हे सभागृह नेहमी समृद्ध होत राहो. इथे येणाऱ्या दिग्गजांच्या अनुभवाने या सभागृहाची उंची आणखी वाढो”, अशा भावना जया बच्चन यांनी व्यक्त केल्या.
यावेळी राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनीदेखील आपल्या भावना व्यक्त केल्या. सर्व खासदारांनी आपल मत मांडताना जे ज्ञान दिलं त्याची खूप आठवण येईल. त्यांच्या जाण्याने सभागृहात पोकळी निर्माण होईल, अशी भावना जगदीप धनखड यांनी मांडली. आमच्या सन्मानित सहकाऱ्यांच्या समोरोपामुळे सभागृहात एक रितेपण येईल. नेहमी असं म्हटलं जातं की, प्रत्येक सुरुवातला एक अंत असतो आणि प्रत्येक अंताला एक नवी सुरुवात असते, असं जगदीप धनखड म्हणाले.