नवी दिल्ली : राजसभेत आज खासदार जया बच्चन (Jaya Bachchan) यांचं आक्रमक रुप पुन्हा एकदा पाहायला मिळालं. राज्यसभेत (RajyaSabha) आज नार्कोटिक्स ड्रग्स आणि सायकोट्रॉपिक पदार्थ (संशोधन) विधेयक 2021 वर चर्चा सुरु होती. या चर्चेदरम्यान सदनातील वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळालं. यावेळी सुरुवातीला काँग्रेस नेते दिग्विजय सिंह (Digvijay Singh) यांनी सरकारवर जोरदार आरोप केले. त्यानंतर जया बच्चन यांचाही पारा चढल्याचं पाहायला मिळालं. त्यांनी तर सरकारचे वाईट दिवस येतील असा शापही देऊन टाकला.
नार्कोटिक्स ड्रग्स आणि सायकोट्रॉपिक पदार्थ (संशोधन) विधेयक 2021 वरील चर्चेसाठी जया बच्चन यांना बोलावण्यात आलं. तेव्हा त्यांनी ‘मी तुम्हाला धन्यवाद देणार नाही. कारण हे लक्षात येत नाही की जेव्हा तुम्ही या बाजूने वेलमध्ये जाऊन घोषणाबाजी करत होता ती वेळ आठवू की, आज तुम्ही त्या खुर्चीवर बसलेले आहात ती वेळ आठवू’, अशा शब्दात आपल्या भाषणाला सुरुवात केली.
जया बच्चन यांच्या बोलण्यावर त्या सदनाची अवहेलना करत असल्याचा आरोप भाजप खासदार राकेश सिन्हा यांनी केला. सोबतच जया बच्चन यांनी संसदेच्या स्पीकरचा व्यक्तिगत स्वरुपात उल्लेख केल्याचा आरोपही त्यांनी केला. राकेश सिन्हा म्हणाले की, ही वर्तणूक योग्य नाही. यामुळे सदनाच्या प्रतिष्ठेला ठेस पोहोचली आहे. कुणीही या प्रकारे चेअरचा अपमान करु शकत नाही.
त्यावेळी चेअरवर भुवनेश्वर कालिता बसले होते. त्यांनी जया बच्चन यांना माननीय सदस्य म्हणून आपली बाजू मांडण्यास सांगितलं. त्यावर जया बच्चन म्हणाल्या की, तुम्ही मला माननीय म्हणालात, पण तुम्ही खरच मला माननीय मानत असाल तर माझं मत लक्ष देऊन ऐका. आम्हाला न्याय हवा आहे. आम्ही त्यांच्याकडून (सरकार) न्यायाची अपेक्षा करु शकत नाहीत. मग तुमच्याकडून करु शकतो का? सदनातील सदस्य आणि बाहेर जे 12 सदस्य बसले आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय करत आहात?
स्पीकरनी जया बच्चन यांना आठवण करुन दिली की नार्कोटिक्स बिलावर चर्चा होत आहे. यावर जया बच्चन म्हणाल्या की, मला बोलण्यासाठी संधी देण्यात आली आहे. आपण मोठ्या मुद्द्यांवर चर्चा न करता फक्त या बिलाच्या क्लॅरिकल एररवर चर्चा करत आहोत. नेमकं काय होत आहे? त्या म्हणाल्या की, तुम्ही कुणासमोर बीन वाजवत आहात? तुमचं वागणं असंच राहिलं तर तुमचे वाईट दिवस लवकरच येतील. यानंतर जया बच्चन यांना बोलण्यापासून थांबवण्यात आलं तेव्हा त्या म्हणाल्या की, ‘मला बोलूच देऊ नका. आम्ही सदनातही बसावं की नाही? आमचा गळा दाबून टाका’.
तेव्हा एका सदस्याने जया बच्चन यांच्यावर वैयक्तिक टिका केली. त्यावेळी जया बच्चन चांगल्याच संतापल्या. ‘यावर कारवाई व्हावी. कुणी कसं काय वैयक्तिक टिप्पणी करु शकतं. इथं बसलेल्या एकाही खासदाराच्या मनात बाहेर बसलेल्या खासदारांबद्दल सन्मान नाही. तुमचे वाईट दिवस येतील. मी शाप देते’, असं जया बच्चन म्हणाल्या. तर संसदेबाहेर माध्यमांशी बोलताना म्हणाल्या की, ‘मी कुणावर वैयक्तिक टिप्पणी करु इच्छित नाही. जे झालं ते व्हायला नको होतं. ते दुर्भाग्यपूर्ण होतं. त्यांनी तशाप्रकारे बोलायला नको होतं. ज्या प्रकारे ते बोलले, त्यामुळे मी निराश झाले आहे.’
इतर बातम्या :