नवी दिल्ली | 21 सप्टेंबर 2023 : राज्यसभेत आज महिला आरक्षणावर चर्चा सुरू होती. त्यासाठी साडेसात तासांचा वेळ देण्यात आला होता. सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या खासदारांना या विषयावर बोलण्यासाठी वेळ नेमून दिली होती. यावेळी प्रत्येकजण पोटतिडकीने बोलत होता. सभागृह सुरू असताना खासदार जया बच्चन यांनाही सभागृह चालवण्याचा अनुभव घेता आला. थोड्यावेळासाठी पीठासीन अधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिलं. सभापती आल्यानंतर त्या आपल्या जागेवर जाऊन बसल्या. त्यानंतर त्यांनी जी कोटी केली, त्यामुळे संपूर्ण सभागृहात एकच खसखस पिकली.
राज्यसभेत महिला आरक्षण विधेयक मंजुरीसाठी मांडण्यात आलं. यावेळी सभापती जगदीप धनखड यांनी महिला खासदारांना त्यांच्या आसनावर बसण्याची संधी दिली. महिला आरक्षणावर चर्चा सुरू असताना आणि चर्चेत महिला खासदार भाग घेत असल्याने महिला खासदारानेच सभापतीच्या खुर्चीवर बसून चर्चा ऐकली पाहिजे या हेतूने धनखड यांनी महिला खासदारांना खुर्चीवर बसण्याची संधी दिली. काही महिला खासदारांनी सभापतीच्या खुर्चीवर बसून चर्चा ऐकली. यावेळी समाजवादी पार्टीच्या खासदार जया बच्चनही सभापतीच्या खुर्चीवर बसून कामकाज पाहिलं.
त्यानंतर जया बच्चन यांनी सभागृहाच्या भव्यतेकडे इशारा करत कोटी केली. या सेव्हन स्टार हॉटेलमध्ये सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुमची खुर्ची आहे. ही खुर्ची झोक्यासारखी पुढे मागे होत असते, अशी कोटी जया बच्चन यांनी करताच एकच खसखस पिकली.
मी सभापती महोदयाचं आभार मानते. मला तुम्ही तुमच्या खुर्चीवर बसण्याची संदी दिली. तुमची खुर्ची अत्यंत मजेदार आहे. त्या खुर्चीवर बसल्यावर ती झोक्यासारखी मागे पुढे होते. तुम्ही वारंवार या खुर्चीवर येऊन का बसता हे मला त्याचवेळी लक्षात आलं, असं जया बच्चन म्हणाल्या. यावेळी त्यांनी सभापती जगदीप धनखड यांचं कौतुकही केलं.
शेवटी बोलण्याचे अनेक तोटे असतात. कारण शेवटी बोलणाऱ्याला बोलण्यासारखं काहीच राहत नाही, असं त्या म्हणाल्या. त्यावेळी धनखड यांनीही शायराना अंदाजात एक विधान केलं. मी एवढा भागात विभागल्या गेलोय की माझ्या वाट्याला काहीच आलेलं नाही, असं धनखड यांनी म्हणताच जया बच्चन यांच्यासह संपूर्ण सभागृहात हशा पिकला.