Jhansi Medical College Fire: उत्तर प्रदेशातील झांसी येथील जिल्हा रुग्णालयात अग्नितांडव घडले. या दुर्घटनेत दहा नवजात बालकांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे सर्वांना धक्का बसला. काही दिवसांच्या मुलांना आई-बापाने गमावले. या रुग्णालयात कुलदीप यांनी त्यांच्या मुलास आठवड्यापूर्वी दाखल केले होते. शुक्रवारी रात्री घडलेल्या दुर्घटनेनंतर त्या मुलाचा काहीच पत्ता लागत नाही. परंतु कुलदीप यांनी स्वता:च्या जीवावर उदार होत पाच नवजात बालकांचे प्राणे वाचवले. मात्र, स्वत:च्या मुलाचा पत्ता लागत नसल्यामुळे भावूक होत ते म्हणाले, ‘मर ही गया, क्या उम्मीद करें सर…’
महोबा जिल्ह्यातील कुलदीप सिंह यांच्या मुलाचा जन्म 9 नोव्हेंबर रोजी झाला. त्या मुलाची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांनी त्याला झांसीमधील मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केले. शुक्रवारी रात्री दुर्घटना घडली तेव्हा कुलदीप मुलासाठी औषध आणण्यास गेले होते. त्यावेळी त्यांच्या पत्नीने त्यांना रुग्णालयात आग लागल्याची माहिती दिली. कुलदीप धावतच वार्डमध्ये दाखल झाले. त्यावेळी आगीने रौद्र रूप धारण केले होते. सर्वत्र प्रचंड आक्रोश माजला होता. मग कुलदीप सिंह यांनी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता मुलांकडे धाव घेतली. त्यांनी पाच मुलांना वाचवले. परंतु त्यांच्या स्वत:चा मुलाचा थांगपत्ता लागला नाही. त्या वार्डमध्ये 54 मुले होती. दुर्घटना घडली तेव्हा ज्या लोकांची मुले होते, त्यांनी आत घुसून त्यांना वाचवले.
कुलदीप म्हणाला, ‘मी दुसऱ्यांचा मुलांना वाचवले. परंतु माझ्या मुलाचा मृत्यू झाला. माझा तो पहिलाच मुलगा होता. त्याचा काहीच पत्ता लागत नाही. आम्ही त्याचा शोध घेऊन थकलो आहे. अधिकाऱ्यांकडून माहिती मिळत नाही. या मुलांना वाचवताना माझा हात जळाला.’
कुलदीप सिंह यांनी सांगितले की, प्रसारमाध्यमांमध्ये वक्तव्य केल्याबद्दल मला रुग्णालय प्रशासनाकडून धमक्या येत आहेत. त्यांच्याकडून मला जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहे. परंतु मी जे पाहिले ते सांगणार आहे. आगीत जखमी झालेल्या 16 मुलांवर वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. त्यातील 10 मुलांची प्रकृती चिंताजनक आहे. एका मुलाला डिस्चार्ज दिला आहे. तसेच 7 मुलांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.