झारखंडच्या राजकारणात सस्पेन्स वाढला, राज्यपालांचं मौन, राष्ट्रपती राजवट लागू होणार?

| Updated on: Feb 01, 2024 | 8:18 PM

चंपई सोरेन यांनी पाच आमदारांसह राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांची भेट घेतली होती. त्यांनी सरकार स्थापनेबाबतचा दावा केला होता. यावेळी चंपई यांनी 43 आमदारांच्या स्वाक्षरीचं समर्थन पत्र राज्यपालांकडे दिलं. तरीदेखील राज्यपालांनी त्यांना सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण दिलेलं नाही. त्यामुळे झारखंडमध्ये आता राष्ट्रपती राजवट तर लागू होणार नाही ना? अशा चर्चांना उधाण आलं आहे.

झारखंडच्या राजकारणात सस्पेन्स वाढला, राज्यपालांचं मौन, राष्ट्रपती राजवट लागू होणार?
Follow us on

रांची | 1 फेब्रुवारी 2024 : झारखंडच्या राजकारणात आता सस्पेन्स वाढला आहे. कारण झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना कथित जमीन घोटाळा प्रकरणी ईडीकडून अटक करण्यात आली आहे. हेमंत सोरेन यांनी काल राजभवन येथे जावून आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपालांकडे सोपवला. त्यानंतर झारखंड मुक्ती मोर्चा पक्षाचे नेते चंपई सोरेन हे राज्याचे नवे मुख्यमंत्री होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे हेमंत सोरेन यांनी राजीनामा दिल्यानंतर सत्ताधारी महागठबंधनचे सर्व आमदार दोन बसमधून राजभवनला दाखल झाले होते. त्यांनी राज्यपालांच्या भेटीची वेळ मागितली होती. राज्यपालांनी सर्वांना भेटीसाठी वेळ दिला नाही. त्यांनी केवळ पाच जणांच्या शिष्टमंडळाला भेटायला परवानगी दिली. त्यानंतर महागठबंधनच्या नेत्यांनी चंपई सोरेन यांना 43 आमदारांच्या पाठिंब्याच्या स्वाक्षरीचे पत्र राज्यपालांकडे सुपूर्द केल्याची माहिती समोर आली होती. झारखंड मुक्ती मोर्चाच्या सर्व आमदारांनी चंपई सोरेन यांना गटनेता म्हणून पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आता चंपई यांच्या नेतृत्वात सरकार बनेल असं मानलं जात होतं. पण राज्यपालांनी आज दिवसभर झारखंड मुक्ती मोर्चाला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण दिलेलं नाही. त्यामुळे झारखंडमध्ये आता राष्ट्रपती राजवट तर लागू होणार नाही ना? अशा चर्चांना उधाण आलं आहे.

चंपई सोरेन यांनी पाच आमदारांसह राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांची भेट घेतली होती. त्यांनी सरकार स्थापनेबाबतचा दावा केला होता. यावेळी चंपई यांनी 43 आमदारांच्या स्वाक्षरीचं समर्थन पत्र राज्यपालांकडे दिलं. तसेच आणखी काही आमदार हे रांचीत पोहोचल्यानंतर आमदारांची संख्या 45 ते 46 होईल, असं त्यांनी राज्यपालांना सांगितलं. तसेच आमदारांमध्ये एकी असल्याचंदेखील त्यानी राज्यपालांना सांगितलं. राज्यपालांनी ते हमीपत्र घेऊन आपण लवकरच याबाबत निर्णय घेऊ, असं आश्वासन दिलं. पण राज्यपालांनी चंपई यांना सत्ता स्थापनेसाठी अजून निमंत्रण न दिल्यामुळे झारखंडमध्ये मोठा राजकीय पेच निर्माण झाल्याचं चित्र आहे.

43 आमदार हैदराबादला रवाना

राज्यपालांकडून सरकार स्थापनेचं निमंत्रण न आल्यामुळे झारखंड मुक्ती मोर्चा आणि इतर सत्ताधारी पक्ष सतर्क झाले आहेत. महागठबंधनचे 43 आमदार आता हैदराबादच्या दिशेला रवाना झाले आहेत. रांचीच्या बिरसा मुंडा विमानतळावर दोन चार्टड फ्लाईटमधून त्यांना हैदराबादला नेलं जात आहे. असं असलं तरी चंपई सोरेन आणि काँग्रेसचे गटनेता आलमगीर आलम हे रांची येथेच राहणार आहेत. ते हैदराबादला जाणार नाहीत.

भाजपला सत्ता स्थापनेसाठी 9 आमदारांची गरज

झारखंडमध्ये विधानसभा सदस्यांची एकूण संख्या ही 81 आहे. यामध्ये बहुमत सिद्ध करण्यासाठी 41 आमदार असणं आवश्यक आहे. ज्या पक्षाकडे 41 आमदारांचं समर्थन असेल त्यांचं सरकार राज्यात स्थापन होईलच. चंपई काल 43 आमदारांचं समर्थन पत्र घेऊन राजभवनात गेले होते. त्यांच्याकडे 47 आमदारांचं समर्थन आहे. यामध्ये झारखंड मुक्ती मोर्चाचे 29, काँग्रेसचे 17, आरजेडीचे 1 आणी सीपीआय (एमएल) 1 असा समावेश आहे. दुसरीकडे एनडीएकडे एकूण 32 आमदारांचं बळ आहे. यामध्ये भाजपचे 26, एजेएसयूचे 3, राष्ट्रवादी अजित पवार गट 1 आणि 2 अपक्ष आमदारांचा समावेश आहे. इथे जर एनडीएला सरकार स्थापन करायचं असेल तर त्यांना 9 आमदारांच्या पाठिंब्यांची नितांत आवश्यकता आहे.