बंगळुरू : कर्नाटकचे माजी मंत्री आणि भाजप नेते रमेश जारकीहोली (Ramesh Jarkiholi ) यांनी महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस गॉडफादर असल्याचं म्हटलंय. तसेच आमदारकीचा राजीनामा देणार नसल्याचंही स्पष्ट केलं. मागील काही दिवसांपासून जारकीहोली पक्षातील काही नेत्यांबाबत नाराज असल्याचं समोर आलं होतं. याबाबत त्यांनी फडणवीसांची भेट घेत चर्चा केली. मात्र, भेटीतील चर्चेचे तपशील देण्यास नकार दिला. ते मैसूरु भेटीनंतर सांबरा विमानतळावर (Sambra airport ) माध्यमांशी संवाद साधला (Karnataka BJP MLA Ramesh Jarkiholi called Devendra Fadnavis God Father).
रमेश जारकीहोली म्हणाले, “मी माझ्या नाराजीबद्दल केवळ जवळच्या मित्र आणि अनुयायांसोबतच चर्चा केली होती. ही माहिती माध्यमांपर्यंत कशी पोहचली याची मला कल्पना नाही. मात्र, मित्र, शुभचिंतक आणि वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा केल्यानंतर मी माझ्या आमदारकीच्या राजीनाम्याचा विचार सोडून दिलाय.”
“मला पुन्हा मंत्री होण्यात कोणताही रस नाही. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) माझे गॉडफादर (Godfather) आहेत. म्हणूनच मी त्यांची भेट घेतली. RSS आणि BJP ने मला सन्मान दिलाय. काँग्रेसमध्ये मी 20 वर्षे असताना हा सन्मान मला कधीही मिळाला नाही. काँग्रेस बुडतं जहाज आहे. मी काँग्रेसमध्ये परत जाण्याचा विचारही करत नाही.”
असं असलं तरी रमेश जारकीहोली यांनी आपला मुंबई दौरा राजकीय असल्याचं स्पष्ट केलं. ते म्हणाले, “मी याबाबत खोट बोलणार नाही. हे खरं आहे की मी मुंबईला माझे गॉडफादर देवेंद्र फडणवीस यांना भेटायला गेलो होतो. यात मी त्यांच्याशी पक्षामधील नाराजीसह राजकीय मुद्द्यांवर चर्चा केली.”