बंगळुरु : कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा (BS Yediyurappa) यांनी अखेर राजीनामा दिला आहे. कर्नाटकात नेतृत्वबदल होण्याच्या चर्चा सुरु असतानाच येडियुरप्पा यांनी पायउतार होण्याचे संकेत दिले होते. गेल्या आठवड्यात येडियुरप्पा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यासह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची दिल्लीत भेट घेतली होती. येडियुरप्पा यांच्या राजीनाम्यानंतर नवा मुख्यमंत्री निवडण्यासाठी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजप कर्नाटकात यूपी मॉडेल राबवण्याची शक्यता असून मुख्यमंत्र्यांच्या साथीला दोन उपमुख्यमंत्री असू शकतात तर ज्येष्ट मंत्र्यांची हकालपट्टी होऊन तरुणांना संधी मिळण्याची शक्यता आहे.
येडियुरप्पा यांच्या राजीनाम्यानंतर कर्नाटकात नवीन राज्य सरकार स्थापन होणार आहे. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या आदेशानुसार उत्तर प्रदेश प्रमाणं कर्नाटकात दोन उपमुख्यमंत्री निवडण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जाऊ शकतो. एक उपमुख्यमंत्री अनुसूचित जमातीचा असू शकतो. येडियुरप्पा यांच्या राजीनाम्यानंतर पार्टी अध्यक्ष जे पी नड्डा यांनी राजकीय घडामोडींवर लक्ष ठेवलेलं आहे. कर्नाटक प्रभारी अरुण सिंह हे केंद्रीय नेतृत्वाच्या संपर्कात आहेत.
भाजपनं कर्नाटकात नवा मुख्यमंत्री निवडण्यासाठी परीक्षकांची नियुक्ती केली आहे. भाजप आमदारांच्या बैठकीत नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा केली जाईल. नवा मुख्यमंत्री नियुक्त होईपर्यंत बी. एस. येडियुरप्पा कर्नाटकचे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहतील.
“कर्नाटकातील जनतेच्या मी ऋणात आहे. मी अधिकारी आणि आमदारांना सांगू इच्छितो, की जनतेने आपल्या सर्वांचा विश्वास गमावला आहे. आपण अधिक कठोर आणि स्वच्छ- प्रामाणिक मार्गाने कार्य केले पाहिजे. बरेच अधिकारी प्रामाणिक आहेत, मात्र सर्वांनीच ते झाले पाहिजे. बंगळुरु हा जागतिक दर्जाच्या शहरात विकसित होत आहे” अशा भावना येडियुरप्पा यांनी व्यक्त केल्या आहेत.
इतर बातम्या:
कर्नाटकाचा पुढचा मुख्यमंत्री लिंगायत समुदायातील नको; येडियुरप्पा यांची भाजपला सूचना
Karnataka BS yediyurappa resign from post of CM BJP will appoint two deputy cm to help New Chief Minister