बंगळुरु : कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा (BS Yediyurappa) यांनी अखेर राजीनामा दिला आहे. “मी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. जेवल्यानंतर राज्यपालांना भेटू” असं त्यांनी कर्नाटक सरकारच्या द्वितीय वर्षपूर्तीनिमित्त आयोजित सोहळ्यात सांगितलं. कर्नाटकात नेतृत्वबदल होण्याच्या चर्चा सुरु असतानाच येडियुरप्पा यांनी पायउतार होण्याचे संकेत दिले होते. गेल्या आठवड्यात येडियुरप्पा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यासह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची दिल्लीत भेट घेतली होती.
काय म्हणाले येडियुरप्पा?
“कर्नाटकातील जनतेच्या मी ऋणात आहे. मी अधिकारी आणि आमदारांना सांगू इच्छितो, की जनतेने आपल्या सर्वांचा विश्वास गमावला आहे. आपण अधिक कठोर आणि स्वच्छ- प्रामाणिक मार्गाने कार्य केले पाहिजे. बरेच अधिकारी प्रामाणिक आहेत, मात्र सर्वांनीच ते झाले पाहिजे. बंगळुरु हा जागतिक दर्जाच्या शहरात विकसित होत आहे” अशा भावना येडियुरप्पा यांनी व्यक्त केल्या आहेत.
I have decided to resign. I will meet the Governor after lunch: Karnataka CM BS Yediyurappa at a programme to mark the celebration of 2 years of his govt pic.twitter.com/sOn0lXAfeD
— ANI (@ANI) July 26, 2021
पायउतार होण्याचे आधीच संकेत
बंगळुरुत झालेल्या धन्वंतरी होमहवनाला हजेरी लावल्यानंतर गेल्या गुरुवारी येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रिपद सोडण्याबाबत भाष्य केलं होतं. “25 जुलैला हायकमांडकडून मला नोटीस मिळणार आहे. त्यानुसार मी पुढचा निर्णय घेईन. पक्ष मजबूत करणे आणि पुढील निवडणुकांमध्ये पक्षाला पुन्हा सत्तेत आणणे, या दृष्टीने माझी पुढची वाटचाल असेल. मी दिवसरात्र त्यासाठीच मेहनत करत असतो, कृपया सहकार्य करा” असं वक्तव्य बीएस येडियुरप्पा यांनी केलं होतं.
काँग्रेस सरकार उलथवून भाजप सत्तेत
नाट्यमय घडामोडींनंतर कर्नाटकातील एचडी कुमारस्वामी (HD Kumaraswamy) यांचं सरकार 23 जुलै 2019 रोजी कोसळलं होतं. विश्वासदर्शक ठरावावेळी कर्नाटक विधानसभेत कुमारस्वामी बहुमत सिद्ध करु शकले नव्हते. यामुळे कर्नाटकात काँग्रेस-जेडीएसचं सरकार कोसळून भाजपचं सरकार आलं. बहुमत चाचणीमध्ये सरकारच्या बाजूने फक्त 99 मतं तर विरोधात 105 मतं पडली होती. बीएस येडियुरप्पा यांनी 26 जुलै 2019 रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती.
संबंधित बातम्या :
येडियुरप्पा राज्यपालांच्या भेटीला, शपथविधी आटोपण्याची तयारी
कर्नाटकात मराठा विकास प्राधिकरणाची स्थापना होणार; मुख्यमंत्री येडियुरप्पांचा मोठा निर्णय
BS Yediyurappa | कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांचे पायउतार होण्याचे संकेत
Karnataka Chief Minister BS Yediyurappa Resigns