कर्नाटकच्या भाजप सरकारवर पुन्हा ‘सीडी’चं संकट?; 15 आमदार बंडाच्या तयारीत?

| Updated on: Jan 22, 2021 | 10:34 AM

कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना पुन्हा एकदा एका वादग्रस्त सीडीने घेरले आहे. (Karnataka circles abuzz with talk of CD linked to Yediyurappa)

कर्नाटकच्या भाजप सरकारवर पुन्हा सीडीचं संकट?; 15 आमदार बंडाच्या तयारीत?
Follow us on

बेंगळुरू: कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना पुन्हा एकदा एका वादग्रस्त सीडीने घेरले आहे. या सीडीवरून 15 बंडखोर आमदारांनी येडियुरप्पा यांच्यावर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. येडियुरप्पांवर टीका करणारे हे 15 आमदार बंडाच्या तयारीत असून त्यामुळे कर्नाटकातील भाजपचं सरकार संकटात सापडलं आहे. (Karnataka circles abuzz with talk of CD linked to Yediyurappa)

मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्या सीडी प्रकरणावरून काँग्रेसचे प्रमुख डीके शिवकुमार यांनीही सरकारवर टीका केली आहे. भाजपचं नाव आता ‘ब्लॅकमेल जनता पार्टी’ ठेवायला हवं. आमदारांना ब्लॅकमेल करूनच भाजपनं सत्ता स्थापन केली आहे, अशी टीका शिवकुमार यांनी केली आहे.

काय आहे सीडीत

एका सीडीवरून जे लोक ब्लॅकमेल करत होते, त्यांनाच येडियुरप्पा यांनी मंत्री बनवल्याचा दावा बंडखोर आमदारांनी केला आहे. 2017मध्ये हे सीडी प्रकरण बाहेर आलं. मुख्यमंत्र्यांचे खासगी सहायक एन. आर,. संतोष यांनी पंचायतराज ग्रामीण विकास मंत्री के. एस. ईश्वरप्पा यांचे सहायक विनय यांचं कथित अपहरण करण्याचा प्रयत्न केला होता. विनयकडे एक सीडी असून ही सीडी हस्तगत करण्यासाठी त्यांच्या अपहरणाचा प्रयत्न झाल्याची चर्चा आहे. या प्रकरणात संतोष जामिनावर आहेत. काही दिवसांपूर्वीच येडियुरप्पा यांनी संतोष यांना त्यांचे राजकीय सल्लागार बनवले होते. मात्र, नोव्हेंबरमध्ये प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यामुळे पुन्हा एकदा ही सीडी चर्चेत आली आहे.

15 आमदार दिल्लीत जाणार

येडियुरप्पा यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार केला. त्यात अनेकांना संधी मिळाली नाही. त्यामुळे अनेक आमदार नाराज आहेत. मंत्रिमंडळात संधी न मिळाल्याने भाजपच्या 15 नाराज आमदारांनी येडियुरप्पांविरोधात दंड थोपाटले आहेत. हे सर्व बंडखोर आमदार एकमेकांच्या संपर्कात असून त्यांनी थेट राष्ट्रीय पक्षाध्यक्षांकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतला आहे. येडियुरप्पा यांनी 17 जानेवारी रोजी मंत्रिमंडळ विस्तार केला. त्यात 7 नव्या चेहऱ्यांचा समावेश केला होता. ज्या लोकांनी आधीपासून सत्ता उपभोगली आहे, त्यांनाच मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. शिवाय या लोकांची मंत्रिमंडळात वर्णी लावण्याची पद्धतही चुकीची आहे, असं या बंडखोरांचं म्हणणं आहे. येडियुरप्पा यांनी ज्येष्ठ मंत्री आणि एमएलसींना सरकार बाहेर ठेवावं आणि तरुणांना मंत्रिमंडळात स्थान द्यावं, अशी मागणीही या बंडखोरांनी केली आहे. जे मंत्री सरकारमध्ये 20 महिन्यांपेक्षा अधिक काळ राहिले आहेत. त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढून त्यांच्या जागी तरुण चेहऱ्यांना संधी दिली पाहिजे. ज्येष्ठ मंत्र्यांनी पक्षासाठी काम केलं पाहिजे. 2023च्या निवडणुकीची तयारी केली पाहिजे, असं भाजपचे आमदार शिवानगौडा नायक यांनी सांगितलं.

सिद्धारमय्यांचं आव्हान

काँग्रेस नेते सिद्धारमय्या यांनी ट्विट करून भाजपला आव्हानच दिलं आहे. अनेक नेत्यांनी एका सीडीद्वारे ब्लॅकमेल करून येडियुरप्पा यांच्याकडून मंत्रिपद मिळवल्याचा आरोप भाजपच्या एका आमदाराने जाहीरपणे केला आहे. त्यामुळे आपल्याला ब्लॅकमेल करणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचं मुख्यमंत्र्यांमध्ये धाडस आहे का?, असा सवाल सिद्धारमय्या यांनी केला आहे. तर, शिवकुमार यांनी भाजपला ब्लॅकमेल जनता पार्टी म्हटलं पाहिजे असा आरोप केला आहे. (Karnataka circles abuzz with talk of CD linked to Yediyurappa)

 

संबंधित बातम्या:

Budget 2021: करदात्यांना झटका बसण्याची शक्यता, केंद्रीय अर्थमंत्र्यांकडून कररचनेत बदल होणार?

देशात पुन्हा एकदा भाजप सरकार?, जाणून घ्या मोदी सरकारची आतापर्यंतची कामगिरी?

ममता बॅनर्जींना आणखी एक धक्का; सहकाऱ्याकडून नव्या पक्षाची स्थापना

(Karnataka circles abuzz with talk of CD linked to Yediyurappa)