कोझिकोड : केरळमध्ये सध्या निपाह व्हायरसने दहशत निर्माण केलीय. निपाह व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या एकूण 6 झाली आहे. निपाह व्हायरसमध्ये मृत्यूदर 40 ते 70 टक्के आहे. कोरोना व्हायरसपेक्षा निपाह व्हायरसमध्ये मृत्यूदर जास्त आहे. इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने ही माहिती दिलीय. केरळमध्येच निपाह व्हायरस का पसरतो? त्यामागची कारणं स्पष्ट नाहीयत, असं ICMR ने म्हटलं आहे. कोझिकोड येथे एका 39 वर्षीय व्यक्तीला निपाह व्हायरसची लागण झालीय. राज्याच्या आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, एक्टिव केसची संख्या वाढून 4 झाली आहे. केरळमध्ये आतापर्यंत 6 रुग्ण निपाह व्हायरसने बाधित आहेत. यात 2 रुग्णांचा मृत्यू झालाय. राज्य सरकारने संक्रमणाचा फैलाव होऊ नये, यासाठी मजबूत तयारी केली आहे. कोझिकोडमध्ये संक्रमित रुग्ण आढळणाऱ्या ग्राम पंचायतींना क्वारंटीन झोन म्हणून घोषित करण्यात येत आहे.
ज्या रुग्णाचा मृत्यू झाला, त्याच्या संपर्कात आलेल्या हाय रिस्क 15 जणांचे नमुने घेण्यात आले आहेत. संक्रमित रुग्णांच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये 950 लोक आले आहेत. आरोग्य अधिकाऱ्याने ही माहिती दिली. 231 जण हाय रिस्क कॅटेगरीतील आहेत. कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये 287 आरोग्य अधिकारी आहेत. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्य मंत्री डॉ भारती प्रवीण पवार यांनी गुरुवारी पुण्याच्या भारतीय चिकित्सा अनुसंधान परिषद- राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेचा (ICMR-NIV) दौरा केला. निपाह व्हायरसला रोखण्यासाठी उचललेल्या पावलांचा आढावा घेतला.
मोनोक्लोनल एंटीबॉडीची मागणी
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने व्हायरसला रोखण्यासाठी राज्याच्या मदतीसाठी डॉ. माला छाबडा यांच्या नेतृत्वाखाली एक टीम बनवलीय. केंद्र आणि ICMR-NIV ने ग्राऊंड टेस्टिंगसाठी एका हाय लेव्हल टीम कोझिकोड येथे पाठवली आहे. या टीमला बायोसेफ्टी लेवल 3 (BSL-3) मोबाइल युनिटसोबत पाठवण्यात आलय. राज्य सरकारने ICMR कडे निपाह संक्रमणावर प्रभावी उपचारासाठी मोनोक्लोनल एंटीबॉडीची मागणी केली होती. 15 सप्टेंबरला मोनोक्लोनल एंटीबॉडी मिळाले. केरळच्या आरोग्य मंत्री वीना जॉर्ज यांनी ही माहिती दिली. राजीव गांधी सेंटर फॉर बायोटेक्नोलॉजीने (RGCB) तिरुवनंतपुरम येथील मोबाइल वायरोलॉजी टेस्टिंग लॅब कोझिकोड येथे पाठवली आहे.