मागच्यावर्षीपासून भारत-कॅनडामधील द्विपक्षीय संबंध प्रचंड ताणले गेले आहेत. आता कुठे गाडी हळूहळू रुळावर येत आहे, असं वाटत असतानाच भारत-कॅनडामध्ये नव्याने वाद उफाळून येण्याची चिन्ह आहेत. कॅनडामध्ये खुलेआम भारत विरोधी कृत्य सुरु आहेत. कॅनडातून समोर आलेल्या एका वादग्रस्त फोटोवर भारताने आक्षेप नोंदवलाय. हिंसेच्या सेलिब्रेशनला आणि उदात्तीकरणाला परवानगी दिल्याचा कॅनडा सरकारवर आरोप आहे. कॅनडाने कट्टरपंथीयांना आश्रय देणं बंद करावं, हिंसेच उदात्तीकरण कुठल्याही सभ्य समाजाचा भाग असू शकत नाही, असं भारताने ट्रूडो सरकारला स्पष्ट शब्दात सांगितलं आहे. ओंटारियोच्या माल्टनमध्ये वादग्रस्त आणि खलिस्तान समर्थनाच्या चित्ररथाची मिरवणूक काढली होती. यावर परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल म्हणाले की, “भारताला कॅनडामधील आपल्या राजनैतिक अधिकाऱ्यांच्या सुरक्षेची चिंता वाटते. भयमुक्त वातावरणात त्यांना काम करायला मिळेल, अशी आम्हाला कॅनडाकडून अपेक्षा आहे”
“कॅनडामधील कट्टरपंथीय आमच्या राजकीय नेतृत्वाविरोधात हिंसक फोटोंचा वापर करतायत, त्यावर आम्ही वारंवार चिंता व्यक्त केली आहे. मागच्यावर्षी आमच्या माजी पंतप्रधानांच्या हत्येचा संदर्भ असलेल्या एक चित्ररथाची मिरवणूक काढण्यात आली होती” असं रणधीर जैस्वाल म्हणाले. “कॅनडामध्ये भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांचे पोस्टर लावून त्यांच्याविरोधात हिंसाचार करण्याची धमकी देण्यात आली आहे. हिंसेच सेलिब्रेशन आणि उदात्तीकरण कुठल्याही सभ्य समाजाचा भाग असू शकत नाही” असं रणधीर जैस्वाल म्हणाले.
भारताने काय म्हटलय?
“लोकशाहीप्रधान देशांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावावर अशा कट्टरपंथीय तत्वांना परवानगी देऊ नये” असं रणधीर जैस्वाल म्हणाले. मागच्यावर्षी सप्टेंबर महिन्यात कॅनडाचे पंतप्रधान ट्रूडो यांनी खलिस्तानी फुटीरतावादी हरदीप सिंह निज्जरच्या हत्या प्रकरणात भारतीय एजंट सहभागी असल्याचा आरोप केला होता.
तीन भारतीयांना अटक
त्यानंतर भारत आणि कॅनडाच्या व्दिपक्षीय संबंधात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. भारताने ट्रूडो यांचे आरोप फेटाळून लावले होते. मागच्या आठवड्यात कॅनडाच्या अधिकाऱ्यांनी तीन भारतीय नागरिकांवर निज्जरच्या हत्येचा आरोप लावला. हे तिघेही विद्यार्थी विजावर कॅनडाला गेले आहेत.