PM Narendra Modi Birthday : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पगार किती? संपत्ती किती? कुठून होते कमाई? तुमच्या मनातील ‘त्या’ प्रश्नांची उत्तरे काय?

| Updated on: Sep 17, 2023 | 10:09 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज देशभरात वाढदिवस साजरा होत आहे. अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. तब्बल आठवडाभर त्यांचा वाढदिवस साजरा केला जाणार आहे. तसेच जगभरातूनही मोदींवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

PM Narendra Modi Birthday : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पगार किती? संपत्ती किती? कुठून होते कमाई? तुमच्या मनातील त्या प्रश्नांची उत्तरे काय?
pm narendra modi
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नवी दिल्ली | 17 सप्टेंबर 2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज 73 वा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्यांच्यावर जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने भाजपने देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने देशभर सेवा सप्ताह पाळला जाणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही राज्यातील सर्व मंत्र्यांना मोदींचा वाढदिवस सेवा सप्ताह म्हणून साजरा करण्याचे आदेश दिले आहेत. मोदी आधी गुजरातचे मुख्यमंत्री होते. आता गेल्या नऊ वर्षापासून पंतप्रधानपदी आहेत. त्यामुळे मोदी यांची संपत्ती किती असेल? त्यांना कुठून मिळकत होते? असे प्रश्न तुम्हाला पडले असतील. तेच आज जाणून घेऊया.

पंतप्रधान नरेंद्र मोदी एकटेच राहतात. त्यामुळे त्यांच्याविषयी अनेकांना कुतुहूल असते. मोदींजवळ काय काय आहे? त्यांचं घर कुठे आहे? त्यांची एकूण संपत्ती किती आहे? ते कुठे गुंतवणूक करतात? त्यांची मिळकत काय आहे? असे प्रश्न लोकांना पडतात. गेल्यावर्षी पंतप्रधान कार्यालयाने मोदींच्या संपत्तीबाबत माहिती शेअर केली होती. काय होती ही माहिती? पुन्हा एकदा तुम्हाला आम्ही ही माहिती देत आहोत.

पगार दोन लाख

भारताच्या पंतप्रधानांना वर्षाला 20 लाख रुपये पगार दिला जातो. त्या हिशोबाने मोदी यांना महिन्याला जवळपास दोन लाख रुपये पगार मिळतो. या पगारात बेसिक पे, डेली अलाऊन्स, खासदार निधीसहीत अन्य भत्ते समाविष्ट आहेत.

एकूण संपत्ती किती?

मोदी यांच्याकडे 2022 पर्यंत चल अचल संपत्ती किती होती याची माहिती पंतप्रधान कार्यालयाने दिली आहे. पंतप्रधान कार्यालयाच्या माहितीनुसार मोदींकडे एकूण 2.23 कोटींची संपत्ती आहे. पंतप्रधान कार्यालयाच्या वेबसाईटवर पाहिले तर मोदींची ही 2.23 कोटींची संपत्ती बहुतेक बँक खात्यांमध्ये जमा आहे.

अचल संपत्ती नाहीच

मोदींकडे अचल संपत्ती नाहीये. गुजरातच्या गांधीनगरात त्यांच्या नावावर जमिनीचा एक तुकडा होता. पण त्यांनी तो दान दिला आहे. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी ऑक्टोबर 2002मध्ये एक निवासी भूखंड खरेदी केला होता. त्यात त्यांचा तिसरा हिस्सा होता. या भूखंडात आणखी दोन हिस्सेदार होते. मात्र, काही काळानंतर त्यांनी ही जमीनही दान करून टाकली. त्यामुळे त्यांच्या नाववरील एकमेव अचल संपत्तीही राहिली नाही.

वाहने नाही

मोदी यांनी बाँड, शेअर आणि म्युच्यूअल फंडमध्ये कोणतीच गुंतवणूक केलेली नाही. त्यांच्याकडे स्वत:चे एकही वाहन नाही. मात्र, मार्च 2022च्या एका डेटानुसार त्यांच्याकडे 1.73 लाख रुपये किंमतीच्या चार सोन्याच्या अंगठ्या होत्या. त्यांनी पोस्टात 9, 5,105 रुपये बचत केलेले आहेत. तर 1,89,305 रुपयांच्या जीवन विमा पॉलिसी काढल्या आहेत.