नवी दिल्ली: तामिळनाडूच्या कुन्नूरमध्ये आज लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या दुर्घटनेत माजी लष्कर प्रमुख आणि सीडीएस बिपीन रावत यांचा मृत्यू झाला. या अपघातात त्यांच्या पत्नीसह आणखी 13 जणांचा मृत्यू झाला आहे. हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर आगीचा भडका उडाला. हेलिकॉप्टरमुळे काही झाडेही कापली गेली. त्यानंतर काही वेळाने संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरले होते.
मीडिया रिपोर्टनुसार, या हेलिकॉप्टरमध्ये एकूण 14 लोक होते. त्यापैकी 13 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेचे फोटोही व्हायरल झाले आहेत. त्यावरून हा अपघात किती मोठा होता हे दिसून येते. हेलिकॉप्टर संपूर्णपणे जळून खाक झालेलं या फोटोत आणि व्हिडीओत दिसत आहे. तसेच आजूबाजूचे काही झाडंही जळून गेल्याचं दिसत आहे.
बिपीन रावत हे पत्नीसह तामिळनाडूच्या उटी येथील वेलिंग्टन कॉलेजमध्ये गेले होते. हे एक डिफेन्स कॉलेज आहे. आर्म्ड फोर्सेजचं कॉलेज आहे. या ठिकाणी रावत यांचा एक कार्यक्रम होता. या महाविद्यालयात त्यांना लेक्चर द्यायचं होतं. त्यामुळे ते Mi-17V5 या लष्कराच्या हेलिकॉप्टरने कोयंबतूरच्या सुलूर एअरबेसहून वेलिंग्टनकडे जात होते. या हेलिकॉप्टरमध्ये त्यांच्यासोबत ब्रिगेडियर रँकचे अधिकारीही होते. तसेच दोन पायलट आणि इतर कर्मचारीही होते.
मिळालेल्या माहितीनुसार, रावत यांचं हेलिकॉप्टर सुलूरच्या वेलिंग्टनकडे जाताना कुन्नूर येथे कोसळलं. तामिळनाडूच्या कुन्नूरपासून नीलगिरीचा डोंगर लागतो. या परिसराला टी इस्टेटही म्हटलं जातं. रावत यांचं हेलिकॉप्टर निलगीरीच्या याच डोंगरात कोसळलं.
भारतीय हवाई दलाने या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. काहींच्या मते खराब हवामानामुळे ही दुर्घटना घडली. तर काहींच्या मते, हवाई दलाचा अहवाल आल्यानंतरच या दुर्घटनेची वास्तव माहिती मिळेल.
रावत ज्या Mi-17V5 हेलिकॉप्टरमधून जात होते. ते एक व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर आहे. या हेलिकॉप्टरला दोन इंजिन असतात. दुर्गम भागासाठीच या हेलिकॉप्टरचा वापर केला जातो. जगातील सर्वात अॅडव्हान्स ट्रान्स्पोर्ट हेलिकॉप्टर म्हणून हे हेलिकॉप्टर प्रसिद्ध आहे. या हेलिकॉप्टरचा लष्कर आणि शस्त्रांचे टान्सपोर्ट, फायर सपोर्ट, गस्त आणि सर्च तसेच रेस्क्यू ऑपरेशनसाठी वापर केला जातो.
संबंधित बातम्या:
VIDEO: लष्कराचे हेलिकॉप्टरला कोसळताच भीषण आग, झाडेही कापली; पाहा व्हिडीओंमधून अपघाताची भीषणता