कोलकातामधील आरजी कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर बलात्कार आणि हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी संजय रॉयची सीबीआयकडून पॉलीग्राफ टेस्ट (लाय डिटेक्टर टेस्ट) करण्यात आली. जेव्हा तो सेमिनार हॉलमध्ये पोहोचला होता, तेव्हा पीडित महिलेचा आधीच मृत्यू झाला होता, असा दावा त्याने या पॉलीग्राफ टेस्टमध्ये केला. याप्रकरणी संजय रॉयने निर्दोष असल्याचं म्हटल्यानंतर सीबीआयकडून त्याची पॉलीग्राफ चाचणी करण्यात आली. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार या चाचणीदरम्यान संजयने अनेक खोटी आणि न पटणारी उत्तरं दिली आहेत. इतकंच नव्हे तर लाय डिटेक्टर टेस्टदरम्यान तो अस्वस्थ आणि चिंताग्रस्त होता, असंही त्यात म्हटलंय.
सीबीआयने विविध पुरावे दाखवून संजयला अनेक प्रश्न विचारले. त्यावेळी घटनास्थळी आपण नव्हतोच, असा दावा संजयने केला. सेमिनार हॉलमध्ये पीडित प्रशिक्षणार्थी डॉक्टर आधीच मृतावस्थेत आढळल्याचं त्याने म्हटलंय. तिचा मृतदेह पाहून मी घाबरून तिथून पळालो, असंही संजय म्हणाला. कोलकाता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेनंतर संजय रॉयने बलात्कार आणि हत्या केल्याची कबुली दिली होती. मात्र आता त्याने या जबाबावरून यू-टर्न घेतला आहे. मी निर्दोष असून मला यात गोवलं जातंय, असा आरोप संजयने केला आहे. बलात्कार आणि हत्येविषयी काहीच माहित नसल्याचं संजय तुरुंगातील गार्ड्सनाही सांगितलंय.
गेल्या आठवड्यात शुक्रवारी संजय सियालदह इथल्या अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयासमोरही असाच दावा केला होता. माझं निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी मी पॉलीग्राफ चाचणीस संमती देतोय, असं संजयने म्हटलं होतं. आरोपीची पॉलीग्राफ चाचणी करण्यापूर्वी त्याची आणि कोर्टाची परवानगी घेणं आवश्यक असतं. सीबीआय आणि पोलिसांना त्याच्या निर्दोषत्वाच्या दाव्यांमध्ये स्पष्ट विसंगती आढळूल आली. “संजय हा तपास अधिकाऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे. त्याच्या चेहऱ्यावर झालेल्या जखमा आणि गुन्ह्याच्या वेळी सेमिनार हॉलमधील त्याची उपस्थिती यांविषयी तो कोणतेच स्पष्टीकरण देऊ शकला नाही,” असं एका अधिकाऱ्याने ‘हिंदुस्तान टाइम्स’शी बोलताना सांगितलंय.
आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पीटलच्या सेमिनार हॉलमध्ये प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टर मृतावस्थेत आढळली होती. शवविच्छेदनदरम्यान तिच्या शरीरावर अनेक जखमा आढळल्या होत्या. संबंधित पीडित महिला तिच्या शिफ्टनंतर सेमिनार हॉलमध्ये आराम करायला गेली होती. पोलिसांनी सीसीटीव्ही तपासले असता 9 ऑगस्ट रोजी आरोपी संजय पहाटे 4.03 वाजताच्या सुमारास रुग्णालयाच्या इमारतीत जाताना दिसला होता. इतकंच नव्हे तर गुन्ह्याच्या ठिकाणी त्यांना त्याचा ब्ल्युटूथ हेडसेटसुद्धा सापडला होता.