UGC NET Exam : येत्या 1 जानेवारी ते 19 जानेवारी 2025 या कालावधीत यूजीसी-नेट ही परीक्षा होणार आहे. सध्या मणिपूरमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरु आहे. या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर कुकी विद्यार्थी संघटनेकडून एक महत्त्वाची मागणी करण्यात आली आहे. सध्या यूजीसी-नेटचे परीक्षा केंद्र इम्फाळमध्ये उभारण्यात आले आहे. मात्र ही परीक्षा मणिपूरच्या चुराचंदपूर जिल्ह्यातील परीक्षा केंद्रात घेतली जावी, अशी मागणी विद्यार्थी संघटनेकडून होत आहे. कारण हिंसाचारामुळे विद्यार्थ्यांना या भागात पोहोचणे अवघडच नव्हे तर धोकादायकही ठरु शकते.
गेल्या काही महिन्यात मणिपूरमध्ये प्राणघातक हिंसाचाराचे प्रमाण वाढले आहे. याप्रकरणी पोलिसांकडून गुन्हेगारांना पकडण्याचा प्रयत्नही सुरु आहे. अशातच आता तेथील विद्यार्थ्यांनी यूजीसी-नेट परीक्षेबाबत आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे. मणिपूरच्या चुराचंदपूर जिल्ह्यात यूजीसी-नेट परीक्षा केंद्र बनवण्याची मागणी कुकी स्टुडंट ऑर्गनायझेशनने नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडे (एनटीए) केली आहे. मणिपूर हिंसाचारामुळे तेथील लोकांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये मोबाईल इंटरनेट सेवा बंद आहे. काही असामाजिक घटक लोकांना भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु पोलिस त्यांच्यावर कारवाई करत आहेत.
कुकी स्टुडंट्स युनियनच्या शिक्षण सचिव थांगमोई हाओकिप यांनी नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या वरिष्ठ संचालक (परीक्षा) डॉ. साधना परासर यांना पत्र लिहून विद्यार्थ्यांच्या समस्या सांगितल्या आहेत. या हिंसाचारामुळे विद्यार्थी अडचणीत आले आहेत. कारण अशा परिस्थितीत इंफाळमध्ये यूजीसी-नेट परीक्षा घेणे अवघडच नाही तर धोकादायकही आहे. त्यामुळेच विद्यार्थी परीक्षेसाठी सुरक्षित पर्यायाची मागणी करत आहेत.
नॅशनल टेस्टिंग एजन्सी यूजीसी नेट डिसेंबर 2024 परीक्षा 1 जानेवारी ते 19 जानेवारी 2025 दरम्यान आयोजित करेल. देशभरातील 350 हून अधिक परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षेच्या काही दिवस अगोदर यासाठीची प्रवेशपत्रे जाहीर केली जातील.
यूजीसी नेट डिसेंबर 2024 परीक्षेसाठी नोंदणी प्रक्रिया सध्या सुरू आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 डिसेंबर असून अर्ज दुरुस्ती विंडो 12-13 डिसेंबर रोजी उघडली जाईल. इच्छुक आणि पात्र उमेदवार यूजीसी नेटच्या अधिकृत वेबसाईट ugcnet.nta.ac.in भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.
या परीक्षेत पेपर 1 आणि पेपर 2 असे दोन पेपर असतात. पेपर 1 मध्ये जनरल नॉलेज, रीजनिंग आणि टीचिंग अॅबिलिटीचे प्रश्न विचारले जातात, तर पेपर 2 मध्ये तुमच्या विषयाशी संबंधित प्रश्न विचारले जातात. यंदा परीक्षेत बदल करण्यात आला असून आपत्ती व्यवस्थापन आणि आयुर्वेद जीवशास्त्र या दोन नव्या विषयांचा परीक्षेत समावेश करण्यात आला आहे. आता एकूण 85 विषयांसाठी यूजीसी नेट परीक्षा होणार आहे.
यूजीसी नेट परीक्षा वर्षातून दोनदा जून आणि डिसेंबरमध्ये घेतली जाते. ही एक पात्रता परीक्षा आहे, ज्याद्वारे देशभरातील महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये ज्युनिअर रिसर्च फेलोशिप आणि सहाय्यक प्राध्यापक पदांसाठी भरती केली जाते. या परीक्षेला बसण्यासाठी उमेदवाराकडे 55 टक्के गुणांसह पदव्युत्तर पदवी किंवा समकक्ष परीक्षा असणे आवश्यक आहे (ओबीसी नॉन-क्रीमी लेअर/ एससी / एससी आणि पीडब्ल्यूडी उमेदवारांसाठी 50 टक्के).