नवी दिल्ली : लखीमपूर खीरी हिंसाचार प्रकरणात काँग्रेसनं आक्रमक पवित्रा घेतलाय. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी लखीमपूरला जात पीडित कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या राजीनाम्याची मागणी राहुल आणि प्रियंका गांधी यांनी केलीय. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाच्या दोन न्यायमूर्तींकडून या प्रकरणाची चौकशी करावी, अशी आग्रही मागणी काँग्रेसकडून करण्यात आलीय. (Rahul Gandhi and Priyanka Gandhi called on President Ramnath Kovind, Demand for resignation of Ajay Mishra)
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतल्यानंतर राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी बोलताना राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेश आणि केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. काही दिवसांपूर्वी आम्ही लखीमपूर खीरीमध्ये ज्या परिवारातील सदस्यांना गाडीखाली चिरडलं गेलं. त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. त्यांनी आम्हाला सांगितलं की ते दोन मागण्या करत आहेत. एक म्हणजे त्यांना न्याय हवाय. ज्या व्यक्तीने ही हत्या केलीय त्याला शिक्षा मिळायला हवी. ज्या वक्तीने हत्या केलीय त्याचे वडील देशाचे गृहराज्यमंत्री आहेत. त्यामुळे जोपर्यंत ती व्यक्ती पदावर आहेत तोपर्यंत योग्य तपास आणि न्याय मिळू शकत नाही. ही बाब आम्ही राष्ट्रपतींना सांगितल्याचं राहुल गांधी म्हणाले.
Letter to President of India, Shri Ram Nath Kovind ji by the Congress delegation led by Shri @RahulGandhi, demanding justice for Lakhimpur Kheri farmers, the need for an independent judicial investigation & the dismissal of MoS Home Affairs, Ajay Mishra. pic.twitter.com/vUE0Nf7L69
— Congress (@INCIndia) October 13, 2021
हा आवाज फक्त त्या परिवाराची नाही तर संपूर्ण देशातील शेतकऱ्यांचा आवाज आहे, ज्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातोय. ज्यांना गाडीखाली चिरडलं जात आहे. त्या व्यक्तीने देशासमोर म्हटलं होतं की सुधारला नाहीत तर मी तुम्हाला सुधारेल. त्यानंतर लखीमपूर खीरीतील घटना घडवून आणली. शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालण्यात आली. तो जे बोलला ते त्याने करुन दाखवलं आहे. आता सर्वोच्च न्यायालयाच्या दोन न्यायमूर्तींकडून याची चौकशी व्हायला हवी आणि पीडित कुटुंबियांना न्याय मिळायला हवा, अशी आक्रमक मागणी राहुल गांधी यांनी केली आहे.
राष्ट्रपतींची भेट घेतल्यानंतर प्रियंका गांधी यांनीही माध्यमांशी संवाद साधला. जर तुम्ही गरीब, दलित, शेतकरी आहात तर तुमच्यासाठी न्याय नाही. मात्र तुम्ही भाजप समर्थक असाल तर तुम्हाला न्याय मिळतो, अशा शब्दात प्रियंका गांधी यांनी केंद्र सरकार आणि भाजपवर जोरदार हल्ला चढवला. आम्ही केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या राजीनाम्याची आणि आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केलीय. राष्ट्रपती आजच सरकारसोबत लखीमपूरबाबत बोलणार आहेत, असंही प्रियंका गांधी यांनी सांगितलं.
इतर बातम्या :
Lakhimpur Violence : लखीमपूर हिंसाचार प्रकरणात आशिष मिश्राला 3 दिवसांची पोलीस कोठडी
सत्तेची ऑफर न स्वीकारण्या इतके शरद पवार कच्च्या गुरुचे चेले नाहीत; चंद्रकांत पाटलांचा पलटवार
Rahul Gandhi and Priyanka Gandhi called on President Ramnath Kovind, Demand for resignation of Ajay Mishra