अखेर लालूंना जामीन, 42 महिने 11 दिवस तुरुंगात काढल्यानंतर बाहेर येणार

| Updated on: Apr 17, 2021 | 2:44 PM

दुमका कोषागार घोटाळ्याप्रकरणी राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांना अखेर जामीन मिळाला आहे. रांची उच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे. (Lalu Prasad Yadav gets bail in Fodder scam)

अखेर लालूंना जामीन, 42 महिने 11 दिवस तुरुंगात काढल्यानंतर बाहेर येणार
Lalu Prasad Yadav
Follow us on

रांची: दुमका कोषागार घोटाळ्याप्रकरणी राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांना अखेर जामीन मिळाला आहे. रांची उच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे 42 महिने 11 दिवस तुरुंगात राहिल्यानंतर अखेर लालूप्रसाद यादव तुरुंगाच्या बाहेर येणार आहेत. कागदपत्रांची सर्व प्रक्रिया पार पाडल्यानंतर ते तुरुंगातून बाहेर येतील, असं सूत्रांनी सांगितलं. (Lalu Prasad Yadav gets bail in Fodder scam)

लालूप्रसाद यादव यांच्या जामिनाच्या याचिकेवर कालच सुनावणी होणार होती. मात्र, कोर्ट बंद असल्याने सुनावणी होऊ शकली नाही. अखेर आज ही सुनावणी होताच कोर्टाने त्यांना जामीन मंजूर केला. जेल मॅन्युअलनुसार कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर लालूप्रसाद यावद तुरुंगाबाहेर येतील. कोरोनामुळे बेल बाँड भरण्याच्या प्रक्रियेला वेळ लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, लालूप्रसाद यांच्यावर दिल्लीच्या एम्समध्ये उपचार सुरू आहेत. आता कोणत्या रुग्णालयात उपचार करायचे हे त्यांच्यावर अवलंबून असणार आहे.

सीबीआयचा विरोध

दुमका कोषागार घोटाळा आणि भ्रष्टाचार प्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने त्यांना 7-7 वर्षाची शिक्षा सुनावली होती. एक शिक्षा संपल्यानंतर दुसरी शिक्षा सुरू करण्याचे कोर्टाने आदेश दिले होते. आता लालूंना याप्रकरणात जामीन मिळाला आहे. लालूंनी दुमका घोटाळ्या प्रकरणी अर्ध्याहून अधिक शिक्षा भोगली आहे. त्यांना अनेक व्याधी आहेत. त्यामुळे त्यांची प्रकृती पाहता, त्यांना जामीन दिला पाहिजे, अशी मागणी त्यांच्या वकिलाने याचिकेतून केली होती. त्याला सीबीआयने विरोध केला होता. एक शिक्षा संपल्यानंतर दुसरी शिक्षा सुरू होईल, असं कोर्टाने म्हटलं असल्याचं सीबीआयने निदर्शनास आणून दिलं होतं.

सिब्बल यांनी माडंली बाजू

सीबीआयच्या युक्तिवादानंतर ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी आक्रमकपणे लालूंची बाजू मांडली. सीबीआय जाणूनबुजून लालूंना तुरुंगातून बाहेर येण्यास मज्जाव करत आहे. त्यांची केस विनाकारण लटकवण्याचं काम सुरू आहे, असं सिब्बल यांनी कोर्टाला सांगितलं. दरम्यान, लालूप्रसाद यादव यांची मुलगी रोहिणी यांनी लालूंच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी म्हणून रोजा ठेवणार असल्याचं सांगितलं होतं. वडिलांची प्रकृती सुधारावी आणि त्यांना लवकरात लवकर न्याय मिळावा म्हणून मी प्रार्थना करणार आहे. तसेच देशात सुख शांती निर्माण व्हावी म्हणूनही प्रार्थना करणार असल्याचं रोहिणी यांनी म्हटलं होतं. मात्र, रोहिणीच्या या वक्तव्यानंतर नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली होती.

दुमका कोषागार प्रकरणात 14 वर्षांची शिक्षा

चारा घोटाळ्याशी संबंधित असलेल्या दुमका कोषागार प्रकरणात सीबीआयच्या विशेष कोर्टाने लालू प्रसाद यादव यांना 14 वर्षांची शिक्षा ठोठावली होती. लालू प्रसाद 23 डिसेंबर 2017 पासून तुरूंगात आहेत. कारण, त्यांना चारा घोटाळ्यात दोषी ठरवण्यात आलं आहे. इतकंच नाही तर लालूंवर बर्‍याच आजारामुळे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (Lalu Prasad Yadav gets bail in Fodder scam)

 

संबंधित बातम्या:

लालू प्रसाद यादव यांची प्रकृती खालावली, श्वास घेण्यासाठी होतोय त्रास

नीरव मोदीच्या प्रत्यार्पणास मंजुरी दिली; कोण आहेत प्रीती पटेल?, वाचा सविस्तर

PNB scam: महाघोटाळेबाज नीरव मोदीला भारतात आणणार; ब्रिटनने दिली प्रत्यार्पणास मंजुरी

(Lalu Prasad Yadav gets bail in Fodder scam)