जिद्दीला सलाम… फक्त पाणी पिऊन जिवंत, लास्ट स्टेजवर असतानाही मतदान; कोण आहे ही महिला?

| Updated on: May 13, 2024 | 5:44 PM

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. आज चौथ्या टप्प्याचं मतदान होतं. देशभरात हे मतदान अत्यंत सुरळीत पार पडत होतं. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. नागरिकांनी मतदान प्रक्रियेत भाग घ्यावा म्हणून निवडणूक आयोगाने प्रचंड जागृती केली होती. त्याचा चांगला परिणाम झाल्याचं दिसून आलं. बिहारच्या दरभंगामध्ये तर प्रत्येकाने आदर्श घ्यावा अशी घटना घडली आहे.

जिद्दीला सलाम... फक्त पाणी पिऊन जिवंत, लास्ट स्टेजवर असतानाही मतदान; कोण आहे ही महिला?
Elections 2024
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

आपल्या देशाच्या संविधानाने प्रत्येकाला मतदानाचा हक्क दिला आहे. हा मतदानाचा अधिकार वापरूनच आपल्याला नवं सरकार निवडायचं असतं. लोकांनी मतदान करावं म्हणून निवडणूक आयोगाकडून वारंवार आवाहन केलं जातं. जनजागृती केली जाते. एवढं करूनही लोक मतदानासाठी घराबाहेर पडत नाहीत. पण काही लोक असेही असतात की ते लग्नाच्या मंडपातूनही मतदान करायला येतात. बिहारच्या दरभंगामध्ये तर दुर्धर आजाराशी झुंज देणाऱ्या एका महिलेने मतदान केलंय. या महिलेला कॅन्सर झाला आहे. ती लास्ट स्टेजवर आहे. आयुष्याच्या शेवटच्या घटका मोजत आहे. तिला हलताही येत नाही. फक्त पाणी पिऊन जिवंत आहे. तरीही तिने स्ट्रेचरवर येऊन मतदान केलंय. मतदान करण्याची आपली जबाबदारी पार पडली आहे.

शुभद्रा देवी असं या महिलेचं नाव आहे. दरभंगा जिल्ह्यातील विशनपूरच्या चौगमा गावात ही महिला राहते. ती कॅन्सरशी झुंज देत आहे. आज मतदान असल्याचं जेव्हा तिला कळलं तेव्हा तिने तिचा मुलगा विजय कुमार मिश्रा यांना बोलावून घेतलं. मलाही मतदान करायचं आहे, असं ती मुलाला म्हणाली. त्यावेळी तू आजारी आहेस. तुला हालताही येत नाही. तू मतदान कशी करू शकतेस? असा सवाल मुलाने केला. मतदान केंद्रापर्यंत तुला कसं न्यायचं? असा सवालही त्याने आईला केला. तेव्हा तिने मला माझी जबाबदारी पार पाडायची आहे. मी मतदान करणारच. मला तिथपर्यंत घेऊन चल, असं म्हटलं.

मतदारही आश्चर्यचकीत

आईचा हा निर्धार पाहून मुलालाही हार मानावी लागली. विजय कुमारने आईसाठी एक स्ट्रेचर मागवलं. त्यानंतर शुभद्रा देवी यांना विष्णुयर चौगमा मध्य विद्यालयाच्या मतदान केंद्रावर आणलं. तिथे आल्यानंतर शुभद्रा यांनी अत्यंत उत्साहात मतदान केलं. त्यानंतर पुन्हा त्यांना घरी आणण्यात आले. साधं हालता येत नसतानाही आणि शेवटच्या स्टेजवर असतानाही ही महिला मतदान करण्यासाठी आलेली पाहून इतर मतदारांनीही आश्चर्य व्यक्त केलं.

फक्त पाण्यावर जिवंत

एक जागरूक नागरिकाचं कर्तव्य म्हणून आईने तिचं उत्तरदायित्त्व निभावलं आहे. आई गेल्या अनेक दिवसापासून आजारी आहे. गेल्या चार दिवसांपासून ती पाण्याच्या चार थेंबांवर जिवंत आहे. तिने खाणं सोडलं आहे. तिनेच मतदान करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे आम्ही तिला नाही म्हणू शकलो नाही. आजारी असूनही जर आई देशाप्रतीची असलेली जबाबदारी पार पाडू इच्छिते तर अशावेळी आम्ही तिला साथ देणं भाग होतं. त्यामुळेच आम्ही तिला स्ट्रेचवर ठेवून पोलिंग बुथपर्यंत आणलं, असं विजय कुमार मिश्रा यांनी सांगितलं.

चौथ्या टप्प्याचं मतदान

आज देशभरात चौथ्या टप्प्याचं मतदान सुरू आहे. देशातील एकूण 96 जागांवर चौथ्या टप्प्याचं मतदान सुरू आहे. दरभंगामध्ये 17 लाख 74 हजार 656 मतदार आहेत. त्यात 9 लाख 33 हजार 122 पुरुष मतदार आहेत. तर 8 लाख 41 हजार 499 महिला मतदार आहेत. त्याशिवाय 35 तृतीयपंथी मतदार आहेत.

इंडिया विरुद्ध एनडीए

सध्या देशात इंडिया आघाडी विरुद्ध एनडीए अशी लढत होत आहे. त्यामुळे या लढतीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. भाजपने 400 पारचा नारा दिला आहे. तर काँग्रेसनेही ही निवडणूक जिंकण्यासाठी कंबर कसली आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारेल हे येत्या 4 जून रोजीच समजणार आहे.