President Election: महात्मा गांधींचे पणतू राष्ट्रपती होणार?; डाव्यांनी सूचवलं गोपाल कृष्ण गांधींचं नाव

| Updated on: Jun 15, 2022 | 1:25 PM

President Election: गोपाल कृष्ण गांधी हे 2017मध्ये उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार होते. मात्र, भाजपचे उमेदवार व्यंकय्या नायडू यांनी त्यांचा पराभव केला होता. काही विरोधी पक्षाच्या नेत्यांनी गांधी यांच्याशी फोनवरून संपर्क साधला.

President Election: महात्मा गांधींचे पणतू राष्ट्रपती होणार?; डाव्यांनी सूचवलं गोपाल कृष्ण गांधींचं नाव
महात्मा गांधींचे पणतू राष्ट्रपती होणार?; डाव्यांनी सूचवलं गोपाल कृष्ण गांधींचं नाव
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नवी दिल्ली: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) यांनी राष्ट्रपतीपदाची निवडणूक (Presidential Polls) लढवण्यात रस नसल्याचं सांगितल्यानंतर विरोधकांकडून आता नव्या नावावर विचार सुरू आहे. डाव्या पक्षांनी राष्ट्रपती पदासाठी महात्मा गांधी यांचे नातू गोपाल कृष्ण गांधी (Gopal Krishna Gandhi) यांचं नाव सूचवलं आहे. मात्र, गांधी यांनी याबाबत विचार करण्यासाठी वेळ मागितला आहे. डाव्या पक्षांच्या नेत्यांनी शरद पवार यांच्याशी चर्चा केली. यावेळी पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल गोपाल कृष्ण गांधी यांना राष्ट्रपती करण्यासाठीची चर्चा झाली. पवारांनीही डाव्यांच्या या नावाला विरोध केला नसल्याचं सूत्रांनी सांगितलं. आज विरोधकांच्या होणाऱ्या बैठकीत गोपाल कृष्ण गांधी यांचे नाव सूचवलं जाण्याची शक्यता आहे. राष्ट्रपतीपदाचा उमेदवार ठरवण्यासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बैठक बोलावली होती. त्यामुळे काही नेत्यांनी गोपाल कृष्ण गांधी यांच्याशी संपर्क साधला होता, असं सांगितलं जात आहे.

गोपाल कृष्ण गांधी हे 2017मध्ये उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार होते. मात्र, भाजपचे उमेदवार व्यंकय्या नायडू यांनी त्यांचा पराभव केला होता. काही विरोधी पक्षाच्या नेत्यांनी गांधी यांच्याशी फोनवरून संपर्क साधला. त्यांना विरोधकांचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याची विनंती विरोधकांनी केली. तर गांधी यांनी विचार करण्यासाठी बुधवारपर्यंतचा वेळ मागितला आहे. गांधी हे 2004 ते 2009 दरम्यान पश्चिम बंगालचे राज्यपाल होते. दरम्यान, राष्ट्रपतीपदासाठी इतर नेत्यांच्या नावाचीही चर्चा सुरू आहे.

हे सुद्धा वाचा

दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंकेत काम

गांधी यांच्यासोबत झालेली चर्चा सकारात्मक होती, असं गांधींशी संपर्क साधणाऱ्या नेत्यांनी सांगितलं. माजी अधिकारी गांधी यांनी दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंकेत भारताचे उच्चायुक्त म्हणून काम पाहिलं आहे. ते महात्मा गांधींचे नातू आहेत. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ममता बॅनर्जी यांनी विरोधकांची बैठक बोलावली. ममतादीदींच्या या एकतर्फी निर्णयावर माकपा आणि भाकपाने नाराजी व्यक्त केली आहे. मात्र, या बैठकीला आमच्या खासदारांना पाठवलं जाईल, असं त्यांनी सांगितलं. टीएमसीने बोलावलेल्या बैठकीला आमचे वरिष्ठ नेते प्रयत्न करणार आहेत, असं माकपाचे महासचिव सीताराम येचुरी आणि भाकपा नेते डी राजा यांनी सांगितलं. या बैठकीला माकपाचे नेते ई. करीम उपस्थित राहणार आहेत. सीताराम येचुरी यांनी याबाबत ममता बॅनर्जी यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे. अशा प्रकारची बैठक बोलावण्याचा निर्णय एकतर्फी आणि आपत्तीजनक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.