Arvind Kejriwal : दिल्लीतही लाडकी बहिण योजना, पण मिळणाऱ्या रक्कमेत मोठा फरक

| Updated on: Dec 12, 2024 | 2:04 PM

Arvind Kejriwal : "काही लोक बोलत होते की, हे होऊ शकत नाही. पण केजरीवाल जे ठरवतो, ते करुन दाखवतो. मला मग कोणी रोखू शकत नाही" असं अरविंद केजरीवाल म्हणाले. भाजपवाले म्हणत होते की, "केजरीवाल खोटं बोलतोय, पैसे कुठून येणार? मी भाजपवाल्यांना सांगिन मी जादूगर आहे"

Arvind Kejriwal : दिल्लीतही लाडकी बहिण योजना, पण मिळणाऱ्या रक्कमेत मोठा फरक
Arvind Kejriwal
Follow us on

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता दिल्लीतही महाराष्ट्रासारखी लाडकी बहिण योजना लागू होणार आहे. आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी मोठी घोषणा केली आहे. त्यांनी सांगितलं की, दिल्ली सरकारने आपलं आश्वासन पूर्ण करत महिला सम्मान निधि योजनेला मंजुरी दिली आहे. ‘मी दिल्लीच्या लोकांसाठी दोन मोठ्या घोषणा करण्यासाठी आलो आहे’ असं केजरीवाल म्हणाले. दोन्ही घोषणा दिल्लीतल्या माझ्या बहिणी आणि मातांसाठी आहेत. दिल्ली सरकार दर महिन्याला महिलांच्या खात्यात एक हजार रुपये जमा करणार आहे. ही योजना लागू झालीय.

दिल्ली सरकारच्या कॅबिनेट बैठकीत प्रस्ताव मंजूर करण्यात आला. दिल्लीत 18 वर्षावरील सर्व महिलांच्या खात्यात ही रक्कम जमा होणार आहे. या योजनेसाठी महिलांना नोंदणी करावी लागेल. ज्या महिला रजिस्ट्रेशन करतील, त्यांच्या खात्यात दर महिन्याला हजार-हजार रुपये जमा व्हायला सुरुवात होईल.

सरकारचा खर्च वाढणार नाही

“महिला कुटुंब चालवतात, मुलांना संस्कार देतात. मुलांना मोठं करतात. या त्यांच्या कामात आम्ही थोडबहुत योगदान देऊ शकलो, तर आम्ही सौभाग्यशाली आहोत. हिंदू धर्मात म्हणतात, जिथे स्त्रीचा सन्मान होतो, देवांच वास्तव्य तिथेच असतं. या योजनेमुळे दिल्ली सरकारचा खर्च वाढणार नाही, तर दिल्ली सरकारची प्रगती होईल” असं केजरीवाल म्हणाले.

मी भाजपवाल्यांना सांगिन मी जादूगर आहे

“काही लोक बोलत होते की, हे होऊ शकत नाही. पण केजरीवाल जे ठरवतो, ते करुन दाखवतो. मला मग कोणी रोखू शकत नाही” असं अरविंद केजरीवाल म्हणाले. भाजपवाले म्हणत होते की, “केजरीवाल खोटं बोलतोय, पैसे कुठून येणार? मी भाजपवाल्यांना सांगिन मी जादूगर आहे. मी अकाऊंट्सचा जादूगर आहे. मला माहितीय पैसे कुठून आणायचे. पैसे कुठे वाचवायचे आणि कुठे खर्च करायचे. तुम्ही चिंता करु नका. मी म्हटलं महिन्याला हजार रुपये देइन तर दर महिन्याला हजार रुपये आजपासून सुरु केलेत”

निवडणुकीनंतर वाढवून किती पैसे देणार?

“आजपासून दिल्ली सरकारने हजार रुपये चालू केलेत. पण निवडणुकीची 10-15 दिवसात घोषणा होऊ शकतो. त्यामुळे आताच अकाऊंटमध्ये पैसे जमा होणं शक्य नाहीय. पण योजना लागू झालीय. उद्यापासून जे रजिस्ट्रेशन सुरु होणार आहे, ते 2100 रुपयांसाठी असेल” असं केजरीवाल यांनी सांगितलं.