टीव्ही9 चा ओपिनियन पोल आला आहे. देशातील एकूण 543 जागांचा या ओपिनियन पोलमध्ये सर्व्हे करण्यात आला आहे. Tv9, Peoples Insight, Polstratच्या सर्व्हेमध्ये देशातील तब्बल 25 लाख लोकांचे सँपल घेण्यात आले आहेत. या पोलमधून देशाचा मूड समजून येत आहे. काही राज्यात भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरशीची लढत होताना दिसत आहे. तर काही राज्यात भाजप क्लिन स्वीप करताना दिसत आहे. मात्र, देशातील असे काही राज्य आहेत की जिथे काँग्रेसला खातंही उघडता येणार नसल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे काँग्रेससाठी हा मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे. ओपिनियन पोलमध्ये आलेली ही राज्ये कोणती? त्याचा घेतलेला हा आढावा.
हिमाचल प्रदेशात चार जागा आहे. या चारही जागा भाजप जिंकताना दिसत आहे. राज्यात काँग्रेसचं सरकार असूनही काँग्रेसला एकही जागा मिळताना दिसत नाहीये. राज्यात एनडीएला 55.73 टक्के मते मिळताना दिसत आहे.
उत्तराखंडातील पाचही जागा भाजपच्या खात्यात जाताना दिसत आहे. या ठिकाणी काँग्रेसचा सुपडा साफ होताना दिसत आहे. एनडीएला 56.77 टक्के तर इंडिया आगाडीला 26.24 टक्के मते मिळताना दिसत आहेत.
दिल्लीतील 7 पैकी 6 जागा भाजप जिंकताना दिसत आहे. तर एक जागा आम आदमी पार्टीला मिळताना दिसत आहे. दिल्लीत एनडीएला 53.47 टक्के तर इंडिया आघाडीला 33.05 टक्के मते मिळताना दिसत आहे. दिल्लीत भाजपला गेल्यावेळीच्या तुलनेत एका जागेचं नुकसान होताना दिसत आहे. पूर्व दिल्लीच्या जागेवर आपला विजय मिळताना दिसत आहे. मात्र, काँग्रेसला एकही जागा मिळताना दिसत नाहीये.
आंध्रप्रदेशात एकूण 25 जागा आहे. या ठिकाणी भाजपला दोन, टीडीपीला 8, वाएसआरसीपीला 13 आणि जेएसपीला दोन जागा मिळताना दिसत आहे. आंध्रात एनडीएला 44.25 टक्के तर वायएसआरसीपीला 45.77 टक्के मते मिळताना दिसत आहेत. इंडिया आघाडीला केवळ चार टक्के मते मिळताना दिसत आहेत. आंध्रातही काँग्रेसच्या हाती भोपळा लागणार असल्याचा अंदाज ओपिनियन पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे.
झारखंडमध्ये 14 जागांपैकी भाजपला 12 जागा मिळताना दिसत आहेत. तर इंडिया आघाडीला केवळ एकच जागा मिळताना दिसत आहे. तीही जेएमएमला मिळताना दिसत आहे. राज्यात काँग्रेसला एकही जागा मिळणार नसल्याचं सर्व्हे सांगतो.
छत्तीसगडमधील 11 जागांपैकी भाजपला सर्व जागांवर विजय मिळताना दिसत आहे. तर काँग्रेसच्या पदरी निराशा येताना दिसत आहे. राज्यात एनडीएला 58.06 टक्के तर इंडिया आघाडीला 28.79 टक्के मते मिळताना दिसत आहेत.
पंजाबमध्ये 13 जागांपैकी आपला आठ जागांवर विजय मिळताना दिसत आहे. तर भाजपला चार जागा मिळण्याची शक्यता आहे. राज्यात काँग्रेसला एकही जागा मिळताना दिसत नाही. काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी सुद्धा पराभूत होताना दिसत आहे. तर शिरोमणी अकाली दल एका जागेवर बाजी मारेल असं चित्र आहे.
मध्यप्रदेशात भाजपने काँग्रेसला विजयाची एकही संधी दिली नसल्याचं चित्र आहे. मध्यप्रदेशात सर्वच्या सर्व 29 जागांवर भाजप विजयी होताना दिसत आहे.
जे मध्यप्रदेशात घडताना दिसतंय तेच गुजरातमध्येही घडताना दिसत आहे. गुजरातमध्ये भाजप सर्वच्या सर्व 26 जागांवर विजयी होताना दिसत आहे. मोदी आणि अमित शाह यांच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसचा सुपडा साफ होताना दिसत आहे.
दिल्लीच्या किल्ल्यात बीजेपीला मोठी संधी मिळताना दिसत आहे. पण काँग्रेसला काहीच मिळताना दिसत नाही. पश्चिम बंगालमधील 42 जागांपैकी टीएमसीला 21 तर एनडीएला 20 जागा मिळताना दिसत आहे. इंडिया आघाडीला केवळ एकच जागा मिळताना दिसत आहे.