नवी दिल्ली | 15 मार्च 2024 : लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा करण्यासाठी निवडणूक आयोगाची बैठक शुक्रवारी झाली. या बैठकीत 16 मार्च रोजी दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद घेण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे शनिवारी दुपारी 3 वाजता आदर्श आचारसंहिता लागणार आहे. देशभरात सात किंवा आठ टप्प्यात मतदान होण्याची शक्यता आहे. तसेच महाराष्ट्रातील 48 जागांसाठी दोन टप्प्यात मतदान होण्याची शक्यता आहे. 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीचे मतदान एकूण सात टप्प्यात झाले होते. पहिल्या टप्प्याचे मतदान 11 एप्रिलला तर शेवटच्या टप्प्यासाठी 19 मे रोजी मतदान झाले. 23 मे रोजी निकाल लागले होते.
निवडणूक आचारसंहिते दरम्यान मतदारांना पैसे वाटणे, भेटवस्तू देणे, लालूच दाखवणे, आमिष देणे म्हणजे आचारसंहितेचे उल्लंघन आहे. तसेच सरकारला विकासकामांची किंवा मतदारांवर प्रभाव पडले, अशी कोणताही घोषणा करता येत नाही.तसेच शासकीय अधिकाऱ्याची बदली करता येत नाही. अन्यथा ते आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन ठरते.
एखाद्या राजकीय पक्षाकडून किंवा कोणत्याही उमेदवाराकडून आचारसंहितेचे उल्लंघन झाल्यास कठोर कारवाई केली जाते. निवडणूक आयोग फौजदारी खटला दाखल करु शकतो किंवा निवडणूक लढवण्यापासून थांबवू शकतो. आचारसंहितेच्या उल्लंघन झाल्याचे सिद्ध झाल्या तुरुंगवासाची शिक्षा होते. या काळात मतदारांवर दबाब आणणे, त्यांना धमक्या देणे ही बाबी आदर्श आचारसंहितेचा भंग करणाऱ्या आहेत.