नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीआधी विरोधी पक्ष आपली एकजूट दाखवण्याचा प्रयत्न करतोय. काँग्रेस प्रणीत विरोधी पक्ष INDIA आघाडीची महत्त्वाची बैठक या महिन्यात 30 आणि 31 ऑगस्टला मुंबईत होणार आहे. या बैठकीआधी INDIA आघाडीतील एक मोठा नेता नाराज असल्याची चर्चा आहे. INDIA आघाडी आकाराला आणण्यासाठी या नेत्याने महत्त्वाची भूमिका बजावली. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार दोन दिवसांपासून दिल्ली दौऱ्यावर आहेत. पण आश्चर्याची बाब म्हणजे दिल्ली प्रवासाच्या पहिल्यादिवशी INDIA आघाडीच्या कुठल्याही नेत्याबरोबर त्यांची भेट झाली नाही.
फक्त माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथी दिनी श्रद्धांजली देण्याव्यतिरिक्त नितीश कुमार कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमात दिसले नाहीत. बुधवारी आपल्या डोळ्यांवर उपचार करण्यासाठी ते एम्स रुग्णालयात जरुर आले होते.
ते जेव्हा-जेव्हा दिल्लीत यायचे, तेव्हा-तेव्हा…
बिहारमध्ये भाजपा बरोबर आघाडी तोडल्यानंतर सप्टेंबर 2022 मध्ये नितीश कुमार यांनी भाजपाविरोधात एक मजबूत आघाडी बनवण्यासाठी मोहिम सुरु केली. जेव्हा-जेव्हा नितीश कुमार दिल्लीत यायचे, तेव्हा विरोधी पक्षाच्या नेत्यांना भेटायचे. दिल्लीत आल्यानंतर सोनिया गांधी, राहुल गांधी मल्लिकार्जुन खर्गे, सातीराम येचुरी, अरविंद केजरीवाल यांना ते भेटायचे. यातील अनेक नेते नितीश कुमार यांना भेटण्यासाठी त्यांच्या 6 कामराज लेन निवासस्थानी जायचे.
यातून अनेक प्रश्न निर्माण होत आहेत
INDIA आघाडी स्थापन झाल्यानंतर दोन महत्त्वाच्या बैठका झाल्या. नितीश कुमार यांच्या दिल्ली दौऱ्याचा दुसरा दिवस आहे. मात्र, तरीही कुठल्या नेत्याबरोबर बैठक न होणं यातून अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. बुधवार नितीश कुमार यांच्या दिल्ली दौऱ्याचा पहिला दिवस होता. अरविंद केजरीवाल यांना भेटून ते वाढदिवसाच्या शुभेच्छा देणार होते. पण संध्याकाळी काँग्रेसकडून दिल्लीत सर्व जागा स्वबळावर लढण्याच वक्तव्य आलं. त्यामुळे अरविंद केजरीवाल यांना भेटून काँग्रेस नेतृत्वाला नाराज करण्याचा धोका त्यांना पत्करायचा नव्हता. त्यामुळे केजरीवालांबरोबर भेट झाली नाही.
INDIA आघाडीत त्यांच्याकजे दुर्लक्ष केलं जातय का?
राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे बुधवारी आपल्या पक्षाच्या झारखंड आणि दिल्ली संघटनांच्या बैठकीमध्ये व्यस्त होते. आज गुरुवारी बिहार काँग्रेसची बैठक स्थगित झाली. राहुल गांधी लडाख दौऱ्यावर जाणार आहेत, त्यामुळे नितीश कुमार यांचं राहुल यांना भेटणं कठीण दिसतय. मल्लिकार्जुन खर्गे यांच्याबरोबर बैठक होऊ शकते.
नितीश कुमार यांन काँग्रेसला सोबत घेऊन भाजपाविरोधात राष्ट्रीय स्तरावर मजबूत आघाडी बनवण्यासाठी मोहिम सुरु केली होती. त्याला यशही मिळालं. फक्त तीन-चार क्षेत्रीय पक्ष सोडल्यास सर्वच विरोधी पक्ष इंडिया आघाडीमध्ये आहेत.