Loksabha election 2024 : लोकसभा निवडणूक जशी जशी जवळ येते तशी भाजपकडून जोरदार तयारी सुरु झाली आहे. एकीकडे इंडिया आघाडीतून प्रादेशिक पक्ष बाहेर पडत असताना दुसरीकडे भाजप प्रादेशिक पक्षांना जवळ घेण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए अधिक मजबूत होताना दिसत आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार एनडीएमध्ये आल्यानंतर आता भाजपने इतर राज्यातील पक्षांना देखील सोबत घेण्यासाठी कमिटी बनवली आहे. त्यातच आणखी एका राज्यातील मुख्यमंत्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला पोहोचले आहेत. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
आंध्र प्रदेशमध्ये भाजप, अभिनेता पवन कल्याण यांचा पक्ष जनसेना आणि चंद्राबाबू नायडू यांचा पक्ष टीडीपी एकत्र निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि YSRCP अध्यक्ष जगनमोहन रेड्डी यांनी शुक्रवारी पंतप्रधान मोदींची भेट घेतली. आहे. आंध्रप्रदेशातील TDP हा आधी एनडीएचा भाग होता पण नंतर आंध्रप्रदेशला विशेष राज्याचा दर्जा मिळावा या मागणीसाठी ते एनडीएतून बाहेर पडले होते.
वायएसआर काँग्रेस पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आंध्रप्रदेशाल विशेष दर्जा द्यावी अशी मागणी केली आहे. याशिवाय राज्यातील प्रलंबित योजनांवरही त्यांच्यामध्ये चर्चा झाली.
भाजप आणि तेलुगु देसम पक्ष पुन्हा एकदा एकत्र येऊ शकतात अशी शक्यता आहे. दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपावरही चर्चा सुरू असल्याचे वृत्त आहे. यासोबतच भाजपने पवन कल्याण यांचा पक्ष जनसेना याला देखील सोबत घेण्याची तयारी केली आहे. त्यामुळे आंध्र प्रदेशातील आगामी निवडणुकीत चुरस वाढली आहे. काही दिवसांपूर्वीच चंद्राबाबू नायडू यांनीही दिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती.
आंध्र प्रदेशमध्ये विधानसभा आणि लोकसभा निवडणुका एकाच वेळी होऊ शकतात. 2019 मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये जगन मोहन रेड्डी यांच्या पक्षाने मोठा विजय मिळवला होता. वायएसआर काँग्रेसने राज्यातील 175 पैकी 151 जागा जिंकल्या होत्या. तर लोकसभेच्या 25 जागांपैकी जगन मोहन रेड्डी यांच्या पक्षाने 22 जागांवर जिंकल्या होत्या.