नवी दिल्ली : देशात लोकसभा निवडणुकीच्या आधी सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. कोणत्याही क्षणी आता निवडणुका जाहीर होऊ शकतात. त्यामुळे सर्वच पक्षाचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत. भारतीय जनता पक्ष देखील निवडणुकीच्या तयारीत गुंतला आहे. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची २९ फेब्रुवारीला बैठक होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीनंतर भाजप आपल्या पहिला १०० उमेदवारांची घोषणा करु शकते. या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्या नावाची देखील घोषणा होऊ शकते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा वाराणसीतून लोकसभा निवडणूक लढवू शकतात. नरेंद्र मोदी हेच पुन्हा एकदा या मतदारसंघातून मैदानात असतील. कारण यूपी हे महत्त्वाचं राज्य आहे. येथून सर्वाधिक खासदार येतात. यूपीमधील जागांवर भाजपच्या मुख्यालयात बैठक देखील झाली. या बैठकीला गृहमंत्री अमित शहा, यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री केशव मौर्य आणि ब्रजेश पाठक यांच्यासह महत्त्वाचे नेते उपस्थित होते. ज्या जागांवर पराभव झाला त्या जागांवर देखील चर्चा करण्यात आली. भाजपने आता रणनीती आखायला सुरुवात केली आहे.
उत्तर प्रदेशसह आणखी पाच राज्यांबाबत देखील रणनीती आखली जाणार आहे. यामध्ये छत्तीसगड, पश्चिम बंगाल, राजस्थान, तेलंगणा आणि केरळ या राज्यांचा समावेश आहे. राजस्थान सोडले तर इतर चार राज्यांच्या विधानसभेत भाजपची सत्ता नाहीये. त्यामुळे या राज्यांमध्ये भाजपला अधिक काम करावे लागणार आहे.
भाजपकडून पहिल्या यादीत महत्त्वाच्या नेत्यांच्या नावाची घोषणा होऊ शकते. ज्यामध्ये केंद्रीय मंत्र्यांचा समावेश आहे. भाजपने यंदा ३७० जागांचं लक्ष्य ठेवलं आहे. तर एनडीएला ४०० जागा मिळतील असा दावा देखील केला जात आहे. त्यामुळे भाजपकडून तशी रणनीती देखील आखली गेली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच भाजपचे सर्वात मोठे स्टार प्रचारक असणार आहेत. मोदींच्याच नेतृत्वात भाजप पुन्हा एकदा निवडणुका लढवणार आहे. त्यानंतर अमित शाह, स्मृती इराणी, नितीन गडकरी, राजनाथ सिंग हे देखील निवडणुकीच्या रिंगणात प्रचार करताना दिसणार आहेत.