पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याची तयारी सुरु झाली आहे. रविवारी ९ जून रोजी संध्याकाळी हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. महत्त्वाचे म्हणजे नवीन मंत्रिमंडळात चंद्राबाबू नायडू यांच्या टीडीपी पक्षाला चार खाते मिळणार असल्याची शक्यता आहे. तर जेडीयूला दोन मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे अशी सूत्रांची माहिती आहे. PM मोदींच्या नवीन मंत्रिमंडळात TDP च्या तीन नेत्यांना स्थान मिळू शकते असे राम मोहन यांनी म्हटले आहे.
नितीश कुमार यांच्या जनता दलाने (युनायटेड) कडून लालन सिंह आणि रामनाथ ठाकूर या दोन ज्येष्ठ नेत्यांचं नाव आघाडीवर आहे. या दोन्ही नेत्यांना मंत्रीपद मिळू शकते. लालन सिंह हे बिहारच्या मुंगेरमधून निवडून आले होते, तर रामनाथ ठाकूर हे राज्यसभेचे खासदार आहेत. रामनाथ ठाकूर हे भारतरत्न कर्पूरी ठाकूर यांचे पुत्र आहेत.
सरकारच्या शपथविधीआधी मंत्रिमंडळात कोणाला किती जागा दिल्या जाणार याबाबत एनडीएची बैठक झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आंध्र प्रदेशमध्ये लोकसभेच्या 16 जागा जिंकणाऱ्या टीडीपीने चार मंत्रीपदं आणि लोकसभा अध्यक्षपदाची मागणी केली होती. तर 12 जागा जिंकणाऱ्या जेडीयूने दोन कॅबिनेट मंत्रीपद मागितल्याचं कळतं आहे.
भाजपला बहुमताचा आकडा गाठता आला नाही. त्यामुळे त्यांना जेडीयू आणि टीडीपीचा पाठिंबा घ्यावा लागला. दोन्ही पक्षाला महत्त्व आल्याने त्यांनी अधिकाधिक मंत्रीपद मिळण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजपला 240 जागा मिळाल्या आहेत. एनडीएने 543 पैकी 293 जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे तिसऱ्यांदा एनडीएचे सरकार येणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत.
भाजप स्वबळावर २७२ जागा जिंकणार नाही हे स्पष्ट झाल्यानंतर इंडिया आघाडीकडून नितीश कुमार यांना ऑफिर देण्यात आल्याची माहिती आहे. जेडीयूच्या एका नेत्यांने सांगितले की, इंडिया आघाडीकडून त्यांना पंतप्रधानपदाची ऑफर होती. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह इंडिया आघाडीतील अनेक वरिष्ठ नेत्यांनी नितीश कुमार यांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी एनडीए आघाडीतच राहणार असल्याचं म्हटलं होतं.
देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी तीन वेळा भारताचे पंतप्रधान पद भूषवले आहे. त्यानंतर आता पंतप्रधान मोदी याची बरोबरी करणार आहेत. पंतप्रधान मोदी रविवारी सलग तिसऱ्यांदा शपथ घेणार आहेत. या शपथविधी सोहळ्याला बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ, भूतान, मालदीव आणि मॉरिशस या देशांसह अनेक शेजारी देशांचे नेते उपस्थित राहणार आहेत.