मुंबई : माँ पाताळ भैरवी मंदिरात असलेल्या १६० फूट उंच शिवलिंगावर ( Shivling ) गुरुवारी क्रेनच्या मदतीने महाभिषेक करण्यात आला. महाभिषेक करण्यासाठी खास मुंबईहून क्रेन मागवण्यात आली होती. ज्यामध्ये १.२५ लाख लिटर पाणी आणि ६ हजार लिटर दुधात हळद, चंदन आणि गुलाबजलही वापरण्यात आले होते. यादरम्यान मुसळधार पाऊस ही सुरु होता, पण भाविकांचा उत्साह जराही कमी झाला नव्हता.
राजनांदगाव जिल्ह्यात असलेल्या या मंदिरात 20 फूट उंच आणि 45 फूट रुंद कलशाच्या सहाय्याने शिवलिंगाचा अभिषेक करण्यात आला. 11 पंडितांनी अभिषेक प्रसंगी नामजप केला. क्रेनच्या साहयाने पाणी आणि दूध अर्पण करत भाविकांनी हर हर महादेवच्या घोषणा दिल्या.
भगवान भोलेनाथाच्या सर्वात मोठ्या शिवलिंगावर दुग्धाभिषेक करण्यासाठी हजारो भाविक या ठिकाणी दाखल झाले होते. छत्तीसगडमधील संस्कारधनी म्हणून प्रसिद्ध असलेल्या राजनांदगाव येथे माँ पाताळ भैरवीचे मंदिर आहे.
मंदिराचे प्रांगण शिवलिंगाच्या आकारात बनवण्यात आले आहे. वरच्या भागात भगवान शिवाची १२ ज्योतिर्लिंगे आहेत. मधल्या भागात माँ राजराजेश्वरी नऊ भव्य रूपात विराजमान आहे. शेवटच्या भागात पाताल भैरवी मां काली दिसते. माँ पाताल भैरवी मंदिर जमिनीपासून १५ फूट खाली बांधले आहे. मातेच्या मूर्तीची उंची 13 फूट आहे.
मंदिराच्या वर एक मोठे शिवलिंग आहे. समोर नंदीची मूर्ती आहे. मंदिरात महादेवाची 14 फूट उंचीची मूर्तीही देखील आहे. ज्याच्या दर्शनासाठी लांबून लोकं येत असतात.