भोपाळ : अयोध्येतील राम मंदिरासाठी एक कोटीहून अधिक रक्कम दान करणारे महंत कनक बिहारी महाराज यांचं निधन झालं आहे. बरमान-सगरी नॅशनल हायवे- 44 वर एका भीषण अपघातात महंत कनक बिहारी महाराज यांचा मृत्यू झाला. बाईकस्वाराचा जीव वाचवताना त्यांची कार डिव्हायडरला आदळून पलटी झाली. त्यात महाराजासह दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली असून अधिक तपास सुरू केला आहे. महंत कनक बिहारी महाराज यांच्या निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे.
महंत कनक बिहारी दास महाराज यांनी उत्तर प्रदेशातील अयोध्येत राम मंदिर बनवण्याच्या कार्यासाठी एक कोटीहून अधिक रक्कम दिली होती. त्यामुळे ते चर्चेत आले होते. त्यांना आधुनिक कर्ण म्हणूनही संबोधलं गेलं होतं. रघुवंश शिरोमणी 1008 नावानेही ते प्रसिद्ध होते. रघुवंशीय समाजातील राष्ट्रीय संत म्हणूनही त्यांची ख्याती होती. महाराजांचा आश्रम मध्यप्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील नोनी येथे होता. कनक महाराज उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथून परत छिंदवाड्याकडे रवाना झाले होते. त्याचवेळी बरमान-सगरी राष्ट्रीय महामार्ग- 44वर रस्ते अपघात झाला. त्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यांना अयोध्येत सर्वात मोठा यज्ञ करायचा होता. त्याच्या तयारीला ते लागले होते. पण त्यापूर्वीच त्यांना देवज्ञा झाली. त्यामुळे सर्वात मोठा यज्ञ करण्याचे त्यांचे स्वप्न अधुरे राहिले आहे.
कनक महाराजांनी रा मंदिरासाठी एक कोटी रुपयाहून अधिक दान दिले होते. त्याशिवाय महाराज 10 फेब्रुवारी 2024 पासून अयोध्येत 9 कुंडी यज्ञ करणार होते. त्याच्याच तयारीसाठी ते रघुवंशी समाजाच्या सर्व गावांमध्ये जात होते, असं रघुवंशी समाजाचे नरसिंहपूर जिल्हा अध्यक्ष राजकुमार रघुवंशी यांनी सांगितलं. आज ते छिंदवाड्याच्या दिशेने निघाले होते. तेव्हा गुना जिल्ह्याजवळ मोटारसायकल स्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात त्यांची कार डिव्हायडरवर जाऊन आदळली. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. महाराजांसोबत छिंदवाड्याचे विश्राम रघुवंशीही होते. त्यांचाही मृत्यू झाला. तसेच महाराजांच्या एका शिष्याचाही मृत्यू झाला. या अपघातात एकाच वेळी समाजातील तीन महत्त्वाच्या व्यक्तींचा मृत्यू झाल्याने समाजावर शोककळा पसरली आहे.
महंत कनक बिहारी महाराज समाजाचे महान संत होते. त्यांचं अकस्मिक जाणं साधू समाजाची मोठी हानी आहे. अयोध्येतील यज्ञाच्या तयारीच्या कामात ते व्यस्त होते. मात्र, अपघातामुळे त्यांचं हे स्वप्न अर्धवटच राहिलं आहे, असं बरमान येथील राम मंदिराचे महंत सीताराम दास महाराज यांनी म्हटलंय.
अयोध्येत भव्य राम मंदिर उभारलं जात आहे. श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्राद्वारे हे काम केलं जात आहे. ऑगस्ट 2020मध्ये राम मंदिराचं भूमीपूजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि सरसंघचालक मोहन भागवत उपस्थित होते.