महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक जाहीर करण्यासाठी निवडणूक आयोगाने शनिवारी पत्रकार परिषद घेतली. निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि इतर दोन निवडणूक आयुक्तांच्या उपस्थितीत निवडणुकीची घोषणा करण्यात आली. निवडणूक जाहीर करण्यापूर्वी आयोगाने गेल्या दोन दिवसांपासून ११ राजकीय पक्षांशी चर्चा केली. या चर्चेत सण उत्सव पाहून निवडणुका घोषित करा, आठवड्याच्या मध्यामध्ये म्हणजे शनिवार, रविवार सोडून मतदान घ्यावे, असे राजकीय पक्षांनी म्हटले. फेक न्यूज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतात, त्यावर नियंत्रणाची मागणी राजकीय पक्षांनी केली, असे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले. या सर्व गोष्टींवर आयोगाने विचार केला आहे. निवडणुका एका टप्प्यात होणार की दोन टप्प्यात होणार हे आम्ही लवकरच स्पष्ट करु, असे निवडणूक आयुक्तांनी यावेळी सांगितले.
महाराष्ट्रात ९.५९ कोटी मतदार आहे. महाराष्ट्रात सर्व व्यक्तीला मतदानाचा अधिकार बजवता यावा, यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. गडचिरोली जिल्ह्यात गरज पडल्यास हेलिकॉप्टरचा वापर करण्यात येणार आहे. राज्यात काही ठिकाणी कमी मतदान होते. त्या ठिकाणी जनजागृती करण्यात येणार आहे. पुणे, कल्याण, कुलाबा या ठिकाणी कमी मतदान होते. परंतु गडचिरोलीत जास्त मतदान होते. कमी मतदान असलेल्या या ठिकाणी मतदान वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. कुलाबामध्ये ४० टक्के, कल्याणमध्ये ४४ टक्के तर कुर्ला येथे ४१ टक्के मतदान मागील निवडणुकीत झाले होते. जम्मू काश्मीरशी तुलना केली तर महाराष्ट्रातील या ठिकाणी कमी मतदान होते. काश्मीरमध्ये दोडामध्ये ७२ टक्के, पुंछमध्ये ७४ टक्के. बस्तरमध्ये ६० टक्के आणि महाराष्ट्रातील गडचिरोली ७३ टक्के मतदान झाले. गडचिरोलीमध्ये एवढे मतदान होत असेल तर कुलाबा, कल्याण आणि पुण्यातही एवढे मतदान होऊ शकतो. निवडणूक दरम्यान तंत्रज्ञानाचा वापर या निवडणुकीसाठी करण्यात येणार आहे, असे निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी म्हटले.
ज्या नेत्यांवर गुन्हे दाखल आहेत त्यांना स्थानिक वृत्तपत्र आणि चॅनलमध्ये तीनदा जाहिरात द्यावी लागणार आहे. त्या जाहिरातीत त्यांच्यावर कोणते गुन्हे दाखल आहेत, ते सांगावे लागणार आहे. तसेच राजकिय पक्षांनाही हा नियम लागू होणार आहे. त्यांना गुन्हे दाखल असलेल्या नेत्याला उमेदवारी का दिली ते सांगावे लागणार आहे.