मुंबई, दि. 8 फेब्रुवारी 2024 | राज्यसभा निवडणूक जाहीर झाली आहे. 56 जागांची येत्या 27 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीचा निकाल 29 फेब्रुवारीला जाहीर होणार आहे. 56 जागांपैकी महाराष्ट्रातील सहा जागा आहेत. राज्यातून केंद्रीय मंत्री नारायण राणे, माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, कुमार केतकर, अनिल देसाई, श्री. व्ही. मुरलीधरन आणि राष्ट्रवादीच्या वंदना चव्हाण हे राज्यसभेतून निवृत्त होत आहे. त्यात भाजपचे तीन खासदार होते. आता सहा पैकी तीन जागा भाजपच्या निवडून येऊ शकतात. त्यामुळे या तीन जागांसाठी आठ नावे महाराष्ट्र भाजपने निश्चित केली आहेत. ही यादी दिल्ली पाठवली आहे. तसेच चौथी जागा लढवावी का? यासंदर्भातही चाचपणी सुरु आहे.
महाराष्ट्र भाजपची बैठक दोन दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्या निवास्थानी झाली. त्या बैठकीत राज्यसभा निवडणुकीवर चर्चा झाली. त्यात आठ नावे निश्चित करण्यात आली. त्यामध्ये नारायण राणे, विनोद तावडे, विजया रहाटकर, अमरीश पटेल, माधव भंडारी, चित्रा वाघ, हर्षवर्धन पाटील, संजय उपाध्याय यांचा समावेश आहे. या आठपैकी तीन जणांची नावे निश्चित होणार आहे. विनोद तावडे यांनी बिहारमध्ये सत्तापरिवर्तन घडवून आणले आहे. यामुळे त्यांना राज्यसभेचे बक्षीस दिले जाणार असल्याची चर्चा आहे. नारायण राणे यांना लोकसभेच्या मैदानात उतरवण्याची तयारी भाजप श्रेष्ठी करत असल्याची चर्चा आहे.
भाजप स्वबळावर दोन जागा निवडून आणू शकते. तिसऱ्या जागेसाठी त्यांना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची गरज आहे. तर चौथ्या जागेसाठी महाविकास आघाडीची मते फोडावी लागणार आहे. सध्या भाजप तीन, अजित पवार यांची राष्ट्रवादी एक आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना एक अशी निवडणूक होऊ शकते. तसेच महाविकास आघाडीचा एक उमेदवार निवडून येऊ शकतो. परंतु भाजपचे लक्ष्य चौथ्या जागेवर आहे. या जागेसाठी वरिष्ठांशी चर्चा महाराष्ट्रातील नेते करत आहेत.
मागील आठवड्यात भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांची नवी दिल्लीत भेट घेतली होती. या बैठकीत राज्यसभा निवडणुकीवर चर्चा झाली. त्यानंतर फडणवीस यांनी महाराष्ट्रात भाजप कोअर कमिटीची बैठक घेतली. त्या बैठकीत आठ नावांची यादी तयार झाली.