हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ‘लोकांनी त्यांचा अंहकाराचा ढोल फोडून टाकला’ असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. हरियाणाचा पॅटर्न महाराष्ट्रात येणार का? या प्रश्नावर बिलकुल येणार असं उत्तर दिलं. “हरियाणात विकास निती जिंकली आहे. महाराष्ट्रात सुद्धा विकासनिती आहे. गेल्या दोन वर्षात महाविकास आघाडीमध्ये बंद असलेले कोस्टल रोड, अटल सेतू, समृद्धी महामार्ग, मेट्रो 3 हे सर्व प्रकल्प आम्ही सुरु केले” असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
“एकीकडे प्रकल्प सुरु केले. उद्योग आणले, रोजगार निर्मिती झाली. विविध कल्याणकारी योजना सुरु केल्या. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना, मुलींना मोफच उच्च शिक्षण, शेतकऱ्यांना वीज बिल माफी, तरुणांना काम दिलं. मविआने त्यांच्या अडीच वर्षाच्या काळात काय केलं ते सांगाव. आम्ही दोन वर्षात काय केलं ते सांगतो. जनतेसमोर लेखा-जोखा मांडू. तिथे दूध का दूध, पानी का पानी होऊ दे” असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
काय बोलले एकनाथ शिंदे?
“हरियाणात विकासावर मतदान झालं. विकासनिती जिंकली. महाराष्ट्रात विकास नितीच्या जोरावर महायुती जिंकणार. शंभर टक्के जिंकणार, मला खात्री आहे. महाराष्ट्राची जनता विकास करणाऱ्यांच्या, फिल्डवर काम करणाऱ्यांच्या पाठिशी उभी राहणार. महाराष्ट्राची जनता घरी बसलेल्यांच्या, फेसबुक लाईव्ह करणाऱ्यांच्या पाठिशी उभी राहणार नाही. महाराष्ट्राची जनता फेस टू फेस, 24 बाय 7 काम करणाऱ्यांच्या पाठिशी उभी राहणार. दोन वर्षातील महायुतीच्या कामांची पोचपावती महाराष्ट्राची जनता देईल” असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.