Maharashtra Flood : महाराष्ट्रात पावसाचा हाहा:कार; सुप्रिया सुळे अमित शाहांच्या भेटीला, शहांकडून सर्वतोपरी मदतीचं आश्वासन

| Updated on: Jul 23, 2021 | 8:07 PM

केंद्र सरकारकडून मदत मिळवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, शिवसेनेचे खासदार अनिल देसाई, खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे. यावेळी त्यांनी अमित शाहांना महाराष्ट्रातील पूरस्थितीची माहिती दिली.

Maharashtra Flood : महाराष्ट्रात पावसाचा हाहा:कार; सुप्रिया सुळे अमित शाहांच्या भेटीला, शहांकडून सर्वतोपरी मदतीचं आश्वासन
सुप्रिया सुळे, अनिल देसाई, प्रियंका चतुर्वेदी केंद्रीय मंत्री अमित शाहांच्या भेटीला
Follow us on

नवी दिल्ली : महाराष्ट्रात मुसळधार पावसानं थैमान घातलं आहे. चिपळूण, महाडनंतर आता कोल्हापूर आणि सांगळीमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. दुसरीकडे रायगड, रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यात दरड कोसळल्यामुळे 70 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. अशावेळी केंद्र सरकारकडून मदत मिळवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, शिवसेनेचे खासदार अनिल देसाई, खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे. यावेळी त्यांनी अमित शाहांना महाराष्ट्रातील पूरस्थितीची माहिती दिली. (Supriya Sule, Anil Desai, Priyanka Chaturvedi to meet Union Home Minister Amit Shah)

सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करुन याबाबत माहिती दिली आहे. यावेळी सुप्रिया सुळे, अनिल देसाई आणि प्रियंका चतुर्वेदी यांनी अमित शाहांना महाराष्ट्रातील महापुराची माहिती दिली. तसंच रायगड, सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्यातील दरड कोसळून झालेल्या दुर्घटनांचीही माहिती दिली. त्यावेळी अमित शाहांकडूनही महाराष्ट्राला केंद्राकडू सर्वतोपरी मदत केली जाईल असं आश्वासन दिलं. या भेटीनंतर सुळे यांनी ट्वीट करुन अमित शाह यांचे आभार मानले आहेत.

अजित पवारांचा संरक्षणमंत्री राजनाथ सिंहांना फोन

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा केली. त्यांना महाराष्ट्रातील सद्यस्थितीची माहिती दिली. राज्यात अतिवृष्टी व दरड कोसळलेल्या भागात सैन्यदलांची मदत तात्काळ उपलब्ध करण्यात आली असून सैन्यदलांची अधिकची मदतही उपलब्ध करण्याचे आश्वासन संरक्षणमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले आहे. अतिवृष्टीग्रस्त भागातील बचाव आणि मदतकार्यासंदर्भात संरक्षण मंत्रालयाशी समन्वय ठेवण्यासाठी राज्य सरकारने मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव असिम गुप्ता यांच्यावर नोडल ऑफिसर म्हणून जबाबदारी सोपवली आहे. राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे स्वत: बचाव व मदकार्यावर लक्ष ठेवून आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सातत्याने अतिवृष्टीग्रस्त भागातील मदत व बचावकार्याचा आढावा घेत असून आवश्यक निर्देश तातडीने दिले जात असल्याची माहीती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

राज्यात सर्वदूर होत असलेल्या अतिवृष्टी व त्यामुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीवर उपमुख्यमंत्री अजित पवार जातीने लक्ष ठेवून आहेत. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री अदिती तटकरे, रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब, सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत, साताऱ्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, राज्यमंत्री शंभूराज देसाई, आमदार अनिकेत तटकरे, भरत गोगावले, भास्कर जाधव, शेखर निकम आदी लोकप्रतिनिधी अतिवृष्टीग्रस्त भागातील बचाव व मदतकार्यात सहभागी झाले असून उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्याकडून तसेच खासदार सुनील तटकरे आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून पुरस्थितीचा आढावा घेतला. आपत्तीग्रस्त नागरिकांना आवश्यक मदत तातडीने उपलब्ध करण्याचे तसेच स्थिती पूर्ववत होईपर्यंत जिल्हा न सोडण्याच्या सूचना उपमुख्यमंत्र्यांनी मंत्रीमहोदयांना तसेच लोकप्रतिनिधींना दिल्या आहेत.

संबंधित बातम्या :

Kolhapur Flood : पंचगंगेची पाणीपातळी 53 फुटांवर, आंबेवाडी, चिखली पाण्याखाली, नागरिकांना घराबाहेर पडण्याचं आवाहन

VIDEO: काल इथे गाव होतं… डोंगराच्या आडोशाला गेले आणि…; तळीयेची दुर्घटना नेमकी कशी घडली?; वाचा सविस्तर

Supriya Sule, Anil Desai, Priyanka Chaturvedi to meet Union Home Minister Amit Shah