लखनऊ: रामल्लला हा आमच्या आस्थेचा विषय आहे. त्यामुळे आम्ही अयोध्येत प्रभू रामाचं दर्शन घेण्यासाठी आलो आहोत. अयोध्यावारीचा राजकारणाशी काही संबंध नाही. आम्ही नेहमी अयोध्येत येतो. त्याप्रमाणे आताही अयोध्येत आलो आहोत, असं शिवसेना नेते आणि महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितलं. आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आज अयोध्या दौऱ्यावर (Ayodhya Visit) आहेत. लखनऊन विमानतळावर पोहोचल्यावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. यावेळी आदित्य ठाकरे यांचं स्वागत करण्यासाठी विमानतळावर शेकडो शिवसैनिक (shivsena) उपस्थित होते. या शिवसैनिकांनी आदित्य ठाकरे यांचं भव्य स्वागत केलं. त्यानंतर आदित्य ठाकरे यांचा ताफा थेट अयोध्येच्या दिशेने निघाला. आज दुपारी ते अयोध्येत पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यानंतर इस्कॉन मंदिराला भेट देणार आहेत. रामलल्लाचं दर्शन घेतल्यानंतर ते संध्याकाळी शरयू तिरावर आरती करणार आहेत.
आम्ही दर्शन घ्यायला आलो आहोत. हा राजकीय विषय नाही. प्रभू रामांकडे कोणतंही मागणं मागणार नाही. आम्ही आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहोत. आम्हाला राज्याची, देशाची सेवा करण्याची संधी मिळाली आहे. ही संधी कायम राहू दे. देशाची आणि जनतेसाठी जे जे चांगलं करता येईल ते करण्याचं बळ मिळो, एवढं मागणं देवाला मागणार आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
अयोध्या आस्थेचा विषय आहे. आम्ही अयोध्येत नेहमी येतो. या पूर्वीही आलो होतो. त्यानंतर राम मंदिराचं काम सुरू झालं. आरोप प्रत्यारोपाचा विषय नाही. ही रामराज्याची भूमी आहे. रामलल्लाची भूमी आहे. इथे राजकारण होत नाही. दर्शन घ्यायला आलोय, असंही त्यांनी सांगितलं. निवडणुकीची रणनीती दाखवण्यासाठी नसते. समाजसेवेसाठी असते, असं ते एका प्रश्नाचं उत्तर देताना म्हणाले.
दरम्यान, आदित्य ठाकरे यांची आज दुपारी पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेत ते काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरे हिंदुत्वावर बोलण्याची शक्यता आहे. इतर राजकीय मुद्द्यांवर ते अधिक भाष्य करणार नसल्याचंही सांगितलं जात आहे.
सकाळी 11 वाजता लखनऊ विमानतळावर आगमन
दुपारी 1.30 वाजता अयोध्येत आगमन, हॉटेल पंचशीलमध्ये उतरणार
दुपारी 3.30 वाजता पत्रकार परिषद
दुपारी 4 ते 4.45 पर्यंत राम नगरच्या इस्कॉन मंदिराला भेट
संध्याकाळी 5.30 वाजता रामलल्लाचं दर्शन, अयोध्या
संध्याकाळी 6.30 वाजता शरयू किनारी आरती
संध्याकाळी 7.30 वाजता लखनऊकडे प्रयाण