कोलकाता: काली या डॉक्यूमेंट्रीच्या (Kaali Movie) पोस्टरवरून सुरू झालेला वाद काही थांबताना दिसत नाही. याबाबत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या पक्षाच्या खासदार महुआ मोइत्रा (Mahua Moitra) यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. त्यावर त्यानी एक वादग्रस्त विधान करून या प्रकरणाला अधिकच हवा दिली. त्यामुळे हा वाद अजून वाढला आहे. माझ्यासाठी माँ कालीची अनेक रुपे आहेत. कालीचा अर्थ मद्य आणि मांसाचा स्वीकार करणारी देवी आहे. लोकांची वेगवेगळी मते असू शकतात. मला त्याबाबतच काहीच अडचण नाही, असं मोइत्रा यांनी म्हटलं. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. मोइत्रा यांच्या या विधानावरून तृणमूल काँग्रेसनेही (TMC) हातवर केले आहेत. तर दुसरीकडे मोइत्रा यांनी टीएमसीचं ट्विटर अकाऊंट अनफॉलो केलं आहे.
The comments made by @MahuaMoitra at the #IndiaTodayConclaveEast2022 and her views expressed on Goddess Kali have been made in her personal capacity and are NOT ENDORSED BY THE PARTY in ANY MANNER OR FORM.
All India Trinamool Congress strongly condemns such comments.
— All India Trinamool Congress (@AITCofficial) July 5, 2022
तृणमूल काँग्रेसने महुआ मोइत्रा यांना टॅग करून ट्विट केलं आहे. एका खासगी कार्यक्रमात महुआ मोइत्रा यांनी देवी कालीवर केलेलं विधान हे त्यांचं वैयक्तिक मत आहे. त्याचा पक्षाशी काहीच संबंध नाही. त्यांच्या व्यक्तिगत क्षमतेनुसार त्यांनी हे विधान केलं आहे. आम्ही त्या विधानाचं समर्थन करत नाही. अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस या विधानाचा तीव्र शब्दात निषेध करत आहे, असं या ट्विटमध्ये म्हटलं आहे. त्यानंतर मोइत्रा यांनी टीएमसीचं ट्विटर अकाऊंट अनफॉलो केलं आहे.
टीएमसीने मोइत्रा यांच्या विधानाचा निषेध केल्यानंतर मोइत्रा यांनीही प्रतिक्रिया व्यक्त करत आपला खुलासा केला आहे. त्यांनी एक ट्विट करून खुलासा केला आहे. तुम्ही सर्व संघी आहात. खोटं बोलल्याने तुम्ही चांगले हिंदू होऊ शकत नाही. मी कधीच कोणत्याही सिनेमाचं किंवा पोस्टरचं समर्थन केलं नाही. मी तर धूम्रपान शब्दाचा उल्लेखही केला नाही. तारापीठमध्ये तुम्ही जा. तिथे माँ कालीला भोग म्हणून काय अर्पण केलं जातं ते पाहा. जय माँ तारा, असं मोइत्रा यांनी म्हटलं आहे.
दक्षिण भारतीय निर्माते मणिमेकलाई यांनी काली ही डॉक्यूमेंट्री तयार केली आहे. त्याचे पोस्टरही लॉन्च करण्यात आले आहेत. त्यात काली माँच्या अवतारातील एक महिला सिगारेट पिताना दिसत आहे. त्यांच्या एका हातात LGBTQ+ समुदायाचा झेंडाही आहे. त्यावर अनेक हिंदू संघटनांनी आक्षेप घेतला आहे.