श्रीनगर– जम्मू काश्मीरच्या (Jammu-Kashmir)रामबन आणि रामसू या राष्ट्रीय महामार्गावर बांधकाम सुरु असलेल्या बोगद्याचा (tunnel)काही भाग कोसळला आहे. या ठिकाणी काम करत असलेले १३ मजूर (13 workers)या ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. बचावकार्य सकाळपासून सुरु असून आत्तापर्यंत ३ जणांना वाचवण्यात यश आले आहे. या ढिगाऱ्याखाली अजूनही १० जण अडकले असल्याची माहिती मदतकार्य करणाऱ्या यंत्रणेने दिली आहे. अद्यापही मदतकार्य सुरु असल्याची माहिती रामबनच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. हा अपघात गुरुवारी झाला, त्यानंतर तातडीने मदतकार्य सुरु करण्यात आले. गुरुवारी रात्री झालेल्या अपघातानंतर आता कुणी जिवंत असेल अशी आशा मावळलेली असली, तरी बचावकार्य जोमाने सुरु आहे.
रामबन ते रामसू या राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरु आहे. या ठिकाणी एक मोठा बोगदाही बांधण्यात येतो आहे. या बोगद्याचे बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणचा काही भाग गुरुवारी रात्री १० च्या सुमारास कोसळला. बोगदा कोसळल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस, सैन्य यांनी एकत्रित बचावकार्य सुरु केले. या अपघातात बोगद्याच्या समोर सुरु असलेले बुलडोझर, ट्रक आणि इत्यादी बांधकाम साहित्याचंही मोठं नुकसान झालं आहे.
केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी ट्विट करत याबाबत दु:ख व्यकस्त केले आहे. त्यांनी लिहिले आहे की, याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी सातत्याने संपर्कात आहे. आत्तापर्यंत १० मजूर ढिगाऱ्याखाली अद्याप गाडलेले आहेत. २ मजुरांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे. बचाव कार्य गतीने सुरु आहे. स्थानिक प्रशासन आणि पोलीस अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. इथे काम करत असलेले मजूर हे प. बंगाल, नेपाळ, आसाम आणि काही स्थानिक काश्मीरचे रहिवासी होते. काल रात्रीपासून हे १० मजूर अडकलेले असल्याने त्यांच्या जगण्याची आशा फारशी नसल्याचेही सांगण्यात येते आहे, तरीही त्यांना वाचवण्याचे पूर्ण प्रयत्न बचावकार्य करणाऱ्या टीमकडून करण्यात येते आहे. संध्याकाळी उशिरा हे मदतकार्य थांबवण्यात येण्याची शक्यता आहे.
बेपत्ता मजुरांपैकी ५ पश्चिम बंगालचे, दोन नेपाळचे , एक आसाम आणि दोन जम्मू काश्मीरचे रहिवासी आहेत. यात जादव रॉय, गौतम रॉय, सुधीर रॉय, दीपक रॉय, परिमल रॉय, नवाज चौधरी, कुशीराम, शिव चौहान, मुज्जफर, इसरत यांचा समावेश आहे. तर जखमींमध्ये विष्णू गोला, आमीन यांचा समावेश आहे. जिल्ह्याचे आणि राज्याचे मोठे अधिकारी घटनास्थळी दाखल झालेले आहेत.