भारताशी पंगा घेणे मालदीवला चांगलेच महागात पडले आहे. मालदीवची अर्थव्यवस्था संकटात आली आहे. मालदीवकडे आता दीड महिना पुरेल इतकीच परकीय गंगाजळी आहे. देशासमोर संकट येताच चीनचे मित्र असलेले मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू वठणीवर आले आहे. आता ते पुन्हा भारत दौऱ्यावर आले आहेत. गेल्या चार महिन्यात त्यांचा हा दुसरा भारत दौरा आहे. दोन्ही राष्ट्रांमधील संबंध अधिक दृढ करण्यासाठी आणि द्विपक्षीय संबंध वाढवण्यासाठी मुइज्जू भारतात येत आहेत.
मालदीवची परकीय गंगाजळी आता 40 कोटी डॉलरवर आली आहे. त्यात फक्त दीड महिन्यांचा खर्च चालणार आहे. मालदीवने ‘इंडिया आऊट’चा नारा दिला होता. तसेच मालदीव सरकारमधील मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. त्यामुळे भारतीयांनी मालदीवच्या पर्यटनावर बहिष्कार टाकण्याची मोहीम सोशल मीडियावर सुरु केली होती. भारतीयांच्या या मोहिमेमुळे मालदीवचे पर्यटन क्षेत्र संकटात आले.
मुइज्जू यांनी भारतात येण्यापूर्वी वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, मालदीव आर्थिक संकटात आहे. आम्हाला आशा आहे, भारत आमची मदत करेल. मालदीव सरकारच्या वेबसाइटवर मुइज्जू यांची भारत यात्रेसंदर्भात एक विशेष पान बनवण्यात आले आहे. त्यात मुइज्जू यांच्या दौऱ्याची सर्व माहिती दिली आहे.
मालदीवला 1965 मध्ये स्वातंत्र मिळाले. त्यानंतर मालदीव भारतावर अनेक गोष्टींवर अवलंबून राहिला आहे.